पदार्पणाच्या सामन्यातच दमदार शतकी खेळी साकारात सलामीवीर फिलीप ह्य़ुजेसने ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा भक्कम पाया रचला, तर कर्णधार जॉर्ज बेली आणि डेव्हिड हसी यांनी अर्धशतके झळकावत त्यावर धावांचा साज चढवल्यामुळे ऑस्ट्रेलियाला ३०५ धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाला १९८ धावांमध्येच तंबूत धाडत ऑस्ट्रेलियाने १०७ धावांनी पराभूत करत एकदिवसीय मालिकेत विजयी बोहनी केली. शतकवीर ह्य़ुजेसला या वेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजीचा निर्णय घेतला आणि ह्य़ुजेसने तो योग्य असल्याचा दाखवून दिला. श्रीलंकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत ह्य़ुजेसने १४ चौकारांच्या जोरावर ११२ धावांची खेळी साकारली. मलिंगाने लसिथ मलिंगाने चंडिमलकरवी त्याला झेलबाद केले तरी ऑस्ट्रेलियाच्या धावांचा ओघ मात्र आटला नाही. बेली आणि डेव्हिड हसी या दोघांनी अप्रतिम फलंदाजी करत अर्धशतके झळकावली आणि संघाला तीनशे धावांचा टप्पा गाठून दिला. बेलीने या वेळी ७९ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ८९ धावांची खेळी साकारली. बेली बाद झाल्यावर डेव्हिडने सारी जबाबजारी आपल्या खांद्यावर घेत ३४ चेंडूंत ६ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ६० धावांची खेळी साकारली.
३०६ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची २ बाद १७ अशी अवस्था झाली. सलामीवीर तिलकरत्ने दिलशान (५१) आणि दिनेश चंडिमल (७३) यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला खरा, पण तो अयशस्वी ठरला. क्लिंट मकायने या वेळी ३३ धावांत सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.