कोनेरू हम्पी व द्रोणावली हरिका या भारतीय खेळाडूंनी महिलांच्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली. त्यांची सहकारी मेरी अ‍ॅन गोम्सला मात्र बरोबरी स्वीकारावी लागली.
पहिल्याच फेरीत काळ्या मोहरांच्या साहाय्याने खेळताना विश्वउपविजेत्या हम्पीने इजिप्तच्या मुमताझ अयाहविरुद्ध शानदार विजय मिळवला. तिने डावाच्या मध्यास खेळावर नियंत्रण मिळविले. शेवटच्या टप्प्यात तिने जोरदार आक्रमक खेळ करीत विजयश्री संपादन केली. हरिकाने अमेरिकेच्या अब्राहमीन तातेव्हचा पराभव केला. तिने सुरुवातीपासून सुरेख डावपेच करीत आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. मेरी गोम्सला मात्र विजयापासून वंचित रहावे लागले. तिच्यापुढे रशियाच्या तातियाना कोसिन्तेसेवा हिचे आव्हान होते. तिने हा डाव जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. मात्र अखेर तिला बरोबरीवर समाधान मानावे लागले.