एकामागोमाग एक मानहानीकारक पराभवांच्या ससेमिऱ्यात अडकलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला विजयपथावर आणण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पावले उचलायला सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून ट्वेन्टी-२० संघाचे प्रशिक्षकपद माइक हसीकडे सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० प्रकारात एकहाती सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूंमध्ये हसीचा समावेश होतो. याव्यतिरिक्त खेळाप्रतीची निष्ठा आणि व्यावसायिक दृष्टिकोनासाठी हसी ओळखला जातो. श्रीलंकेविरुद्धच्या मायदेशात होणाऱ्या मालिकेसाठी हसीकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात येण्याचे संकेत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिले आहेत. याच काळात कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. यामुळे ट्वेन्टी-२० संघाला सक्षम मार्गदर्शकाची आवश्यकता आहे.

७९ कसोटीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केलेल्या हसीने ट्वेन्टी-२० विश्वचषकादरम्यान ऑस्ट्रेलिया संघाचा फलंदाजी सल्लागार म्हणून काम पाहिले होते. त्याआधी ऑस्ट्रेलिया अ संघाचे साहाय्यक प्रशिक्षक म्हणून हसीने जबाबदारी सांभाळली होती.

‘प्रशिक्षकपद स्वीकारण्यासाठी मी उत्सुक आहे. मात्र पूर्णवेळ प्रशिक्षकपद ही मोठी जबाबदारी आहे. यासाठी वर्षांतील १० महिने घरापासून दूर राहावे लागते. हे मला आता शक्य नाही. परंतु छोटय़ा स्वरूपाच्या जबाबदारीसाठी मी तयार आहे. माझ्या अनुभवाचा आणि कौशल्यांचा ऑस्ट्रेलिया संघाला उपयोग झाला तर माझ्यासाठी समाधानकारक गोष्ट आहे,’ असे हसीने सांगितले.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेनंतर मुख्य प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांच्यावरचे दडपण वाढले आहे. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे प्रशिक्षकपद नाकारणाऱ्या रिकी पॉन्टिंगच्या नावाची प्रशिक्षक म्हणून चर्चा आहे. ऑस्ट्रेलियाच्या सार्वकालीन महान कर्णधारांमध्ये पॉन्टिंगचा समावेश होतो.