गुन्हेगारी खटला प्रलंबित असल्यामुळे द्रोणाचार्य पुरस्काराचा मार्ग रोखला

गुन्हेगारी स्वरूपाची बदनामी केल्याचा खटला प्रलंबित असल्यामुळे पॅरा-क्रीडा प्रशिक्षक सत्यनारायण शिमोगा यांचे नाव केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने या वर्षीच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेल्या यादीतील काढून टाकले आहे. मात्र खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारासाठीच्या शिफारशी करण्यात आलेल्या यादीमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि वेटलिफ्टर संजिता चानू यांचा अर्ज उशिरा आल्यामुळे या यादीत त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

याबाबत क्रीडा मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘गुन्हेगारी स्वरूपाचा खटला चालवला जात असल्यामुळे सत्यनारायण यांचे नाव यादीतून हटवण्यात आले आहे. न्यायालयाने निर्दोष सिद्ध केले, तरच त्यांच्या नावाचा भविष्यात विचार केला जाईल.’’

सत्यनारायण यांनी पॅरालिम्पिक उंचउडीपटू मरियप्पन थांगाव्हेलूला मार्गदर्शन केले होते. मरियप्पनने रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झालेल्या १७ खेळाडूंमध्ये मरियप्पनचाही समावेश आहे.

सत्यनारायण यांनी १३ ऑगस्टला क्रीडा मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात काही विरोधकांनी माझ्याविरोधात मोहीम उघडली आहे, असे म्हटले होते. मरियप्पननेही क्रीडा मंत्रालयाला पत्र लिहून सत्यनारायण यांना पुरस्कार द्यावा, अशी शिफारस केली होती. मात्र क्लीन स्पोर्ट्स इंडियाच्या अश्विनी नाचप्पा यांनी ६ ऑगस्टला पत्र लिहून त्यांच्या नावाला आक्षेप घेतला होता.

क्रीडामंत्री विजय गोयल यांनी हिरवा कंदील दिल्यानंतर पुरस्कार विजेत्यांना यासंदर्भात कळवण्यात आले आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. निवड समितीने दोन पॅरालिम्पिकपटूंसह एकंदर १७ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड केली आहे. याचप्रमाणे हॉकीपटू सरदार सिंग आणि रिओ पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा देवेंद्र झझारिया यांची खेलरत्न पुरस्कारासाठी निवड केली आहे.

न्यायमूर्ती (निवृत्त) सी. के. ठक्कर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने शिफारस केलेल्या यादीवर क्रीडा मंत्रालयाने शिक्कामोर्तब केले. अखिल भारतीय टेनिस असोसिएशनने बोपण्णाचा अर्ज उशिराने मंत्रालयाकडे सादर केला होता. क्रीडा मंत्रालयाकडून त्याचे नाव या यादीत समाविष्ट करण्याची शक्यता होती, परंतु ती मावळली.

द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त करण्याची माझी संधी चुकीच्या पद्धतीने नाकारण्यात आली आहे. माझ्या यशावर नाराज असणाऱ्या काही मंडळींनी चुकीचे आरोप करून माझ्या पुरस्काराच्या मार्गात अडथळे आणले आहेत. बदनामीच्या खटल्यामुळे माझे नाव पुरस्कार यादीतून काढून टाकण्यात आल्याचे वृत्त समजताच मला धक्का बसला आहे.  सत्यनारायण शिमोगा