इंग्लंड दौऱ्यादरम्यान अपयशी ठरलेल्या चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियन दौऱ्यासाठी आपल्या तांत्रिक शैलीवर मेहनत घेतली असून ऑस्ट्रेलिया दौऱ्यात धावांची टांकसाळ उघडेन, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
‘‘इंग्लंड दौऱ्यात माझ्या फलंदाजीवर परिणाम झाला होता. पण खेळाडूंच्या आयुष्यात असे कटू प्रसंग येत असतात. अपयशातून बरेच काही शिकता येते. अपयशी ठरत असता, तेव्हा तुमच्या फलंदाजी शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. शैलीत सुधारणा केल्यानंतर मी आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सज्ज झालो आहे. गेल्या दोन परदेशी दौऱ्यातील माझ्या कामगिरीचे निरीक्षण केल्यानंतर मी चुकीची फटकेबाजी करत असल्याचे माझ्या लक्षात आले. या कच्च्या दुव्यांवर मी मेहनत घेतली आहे,’’ असे पुजाराने सांगितले.
अ‍ॅडलेडला आम्ही चांगलेच सरावलो आहोत -रोहित
अ‍ॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात संघाची कामगिरी चांगली होईल, असा विश्वास भारतीय फलंदाज रोहित शर्माने व्यक्त केला आहे. गेले दोन आठवडे आम्ही अ‍ॅडलेडच्या वातावरणाचा अनुभव घेत आहोत. या ठिकाणी आम्ही दोन सराव सामने खेळलो आहोत. त्याचा आम्हाला नक्की फायदा होईल, असे रोहितने सांगितले. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिलिप ह्युजच्या मृत्यूमुळे कसोटी मालिकेच्या कार्यक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय संघाला मात्र अ‍ॅडलेडलाच थांबावे लागले आहे.

भारताला वेदना देण्यासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज -वॉटसन
अ‍ॅडलेड : फिलिप ह्य़ुजच्या मृत्यूमुळे ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला असला तरी मंगळवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात आक्रमक खेळ करून भारताला वेदना देण्यासाठी कांगारूंचा संघ सज्ज झाला आहे, असे मत अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसनने व्यक्त केले.
‘‘ऑस्ट्रेलिया संघासाठी गेला आठवडा खरोखरच आव्हानात्मक होता. पण ऑस्ट्रेलिया संघ पूर्वीचाच आक्रमक खेळ कायम ठेवणार आहे. गेल्या वर्षी भारताकडून पत्करलेल्या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आक्रमक खेळ करतो, तेव्हा ऑस्ट्रेलिया संघाची कामगिरी चांगली होते. भारताने घरच्या वातावरणात ऑस्ट्रेलियाला धूळ चारली, आता ऑस्ट्रेलिया संघ अनुकूल वातावरणात भारतीय संघाला नामोहरम करण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहे, याची जाणीव भारताला आहे,’’ असे वॉटसन म्हणाला.

भारताला कणखर मानसिकतेची गरज -लॉसन
अ‍ॅडलेड : उत्तम तांत्रिक शैली आणि कणखर मानसिकता असल्यास भारतीय संघ ऑस्ट्रेलिया संघावर वरचढ ठरेल, असे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू जेफ लॉसन यांना वाटते. ‘‘गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सचिन तेंडुलकर कारकीर्दीतील १००वी कसोटी खेळणार होता. पण पीटर सिडल, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल जॉन्सन, रयान हॅरिस आणि मिचेल स्टार्क या वेगवान गोलंदाजांचा सामना करताना सचिनकडे शैलीचा अभाव होता आणि मानसिक कणखरताही लोप पावली होती. त्यामुळेच भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण या वेळी ह्य़ुजच्या मृत्यूने ऑस्ट्रेलिया संघ खचला असल्याचा फायदा भारताला उठवता येऊ शकतो,’’ असे लॉसन म्हणाले.

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत तिसऱ्या स्थानाचे भारताचे ध्येय
दुबई : आयसीसी कसोटी क्रमवारीतील सांघिक यादीत तिसरे स्थान गाठण्याचे भारताचे ध्येय आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला ९ डिसेंबरपासून अ‍ॅडलेड कसोटीने प्रारंभ होत आहे. त्यानिमित्ताने सहाव्या क्रमांकावर असलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला क्रमवारीत आगेकूच करण्याची संधी असेल.