जागतिक स्तरावर पाच वेळा विजेतेपद मिळवले असले तरी पुन्हा या सर्वोच्च स्थानावर मोहोर नोंदवण्याची माझी भूक संपलेली नाही, असे भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदने सांगितले.
एनआयआयटीच्या कार्यक्रमासाठी पुण्यात आला असताना आनंदने पत्रकारांशी दिलखुलासपणे संवाद साधला. तो म्हणाला, ‘‘कोणत्याही स्पर्धेत यश व अपयश या दोन्ही बाजू असतात. विश्व अजिंक्यपद स्पर्धेत मी अधिक आव्हानात्मक वृत्तीने खेळलो. मॅग्नस कार्लसनविरुद्ध पराभूत झालो तरी यंदा माझी कामगिरी समाधानकारक झाली आहे. या लढतीत डावावर नियंत्रण मिळवण्याच्या अनेक सोप्या संधी मी वाया घालविल्या. संधीचा लाभ मला घेता आला नाही. ही स्पर्धा आता दोन वर्षांनी होत असल्यामुळे त्याच्यासाठी तयारी करण्याकरिता भरपूर वेळ मिळणार आहे.’’
 लंडन क्लासिक स्पर्धेतील विजेतेपदाबद्दल आनंद म्हणाला, ‘‘विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील पराभवानंतर लगेच झालेल्या या स्पर्धेतील विजेतेपदामुळे मी संपलेलो नाही, हे बुद्धिबळ पंडितांना कळले आहे. यंदा या स्पर्धेसह तीन स्पर्धामध्ये मला विजेतेपद मिळाले आहे. ही विजेतेपदे माझ्यासाठी आगामी वर्षांकरिता प्रेरणादायक आहेत. पुढील वर्षी सर्वोत्तम यश मिळविण्याचे माझे ध्येय आहे. नवीन काही स्पर्धामध्ये भाग घेण्याचा माझा विचार आहे.’’
युवा खेळाडूंशी खेळताना अपेक्षेइतके गांभीर्याने घेत नाही काय, असे विचारले असता आनंद म्हणाला, ‘‘खेळाचे स्वरूप बदलत चालले आहे. मला पारंपरिक व्यूहरचनेस आधुनिकतेची जोड द्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने मी आता खूप गृहपाठ करणार आहे.’’
भारतीय खेळाडूंविषयी तो म्हणाला, ‘अरविंद चिदंबरम व कार्तिकेयन यांनी नुकताच ग्रँडमास्टर किताब मिळविला आहे. या खेळाडूंमध्ये २७०० मानांकन गुणांपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे. आपल्या देशातील भरपूर खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवत आहेत. तसेच जागतिक स्तरावरील स्पर्धाही आपल्या देशात आयोजित केल्या जात आहेत. त्यामुळे या खेळास सुगीचे दिवस आले आहेत. आसाम, त्रिपुरा, छत्तीसगढ, पंजाब, गुजरात आदी राज्यांमध्येही या खेळाची भरपूर प्रगती झाली आहे.’’
पुणे हे बुद्धिबळाचे माहेरघर
पुणे शहर हे बुद्धिबळाचे माहेरघरच झाले आहे. या शहरात अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. अनेक प्रशिक्षक व अव्वल दर्जाचे खेळाडू येथून तयार झाले आहेत असेही आनंदने सांगितले.