ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन-डे मालिका ४-१ ने जिंकल्यानंतर काल रात्री बीसीसीआयने टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग ४ सामन्यात अर्धशतक झळकावलेल्या मुंबईकर अजिंक्य रहाणेला निवड समितीने वगळलं. मोहम्मद शमी, उमेश यादव यांनाही विश्रांती देत निवड समितीने आशिष नेहरा, दिनेश कार्तिक या खेळाडूंवर आपला विश्वास दाखवला. अजिंक्यला वगळण्याच्या निर्णयावर नेटीझन्सनी आपली नाराजी व्यक्त केली. मात्र अजिंक्य रहाणेने, आपण निवड समितीच्या निर्णयाचा आदर करत असल्याचं सांगत या प्रकरणावर पडदा टाकला आहे.

अवश्य वाचा – टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, अजिंक्य रहाणेला वगळलं

गेल्या वर्षभरात भारतीय संघ खूप क्रिकेट खेळला आहे. त्यामुळे खेळाडूंना विश्रांती देण्याबाबत किंवा एखाद्या खेळाडूला वगळून नवीन खेळाडूंना संधी देण्याबाबत निवड समिती जो निर्णय देईल तो आपल्याला मान्य असल्याचं, अजिंक्यने म्हणलंय. “संघात आपली जागा टिकवायची असेल तर प्रत्येकाला सर्वोत्तम कामगिरी करणं गरजेचं असतं. त्यामुळे जो खेळाडू चांगली कामगिरी करतो, त्याला संघात जागा मिळते. त्यामुळे आपलं स्थान पक्क करण्यासाठी सध्या संघात जी स्पर्धा सुरु आहे”, त्याचा मी पुरेपूर आनंद घेत असल्याचंही अजिंक्य म्हणाला.

अजिंक्य रहाणे भारतीय कसोटी संघाचा महत्वाचा भाग असला, तरीही वन-डे संघात त्याचं स्थान अजुनही पक्क झालं नाहीये. शिखर धवनच्या अनुपस्थितीत त्याला पर्यायी सलामीवीर म्हणून संघात जागा मिळते. मात्र आतापर्यंत संघात जागा मिळाल्यानंतर अजिंक्यने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलंय. चॅम्पियन्स करंडकानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत अजिंक्यने सर्वाधीक धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या मालिकेत अजिंक्यने सलग ४ सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावली होती.

२०१९ च्या विश्वचषकाआधी भारताच्या राखीव फळीची ताकद आजमावून पाहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. सध्याच्या घडीला प्रत्येक खेळाडू जीवापाड मेहनत घेत मिळालेल्या संधीचं सोनं करतोय. त्यामुळे टी-२० संघातून वगळ्याच्या निर्णयाचा आपण आदर करत असल्याचं अजिंक्य रहाणेने स्पष्ट केलं.