क्रिकेटच्या मैदानात भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघातील खेळाडू शोएब मलिकसोबत भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झानं विवाह केला. सानिया जरी पाकिस्तानची सून झाली असली तरी, माहेर असलेल्या भारताबद्दलची निष्ठा कायम आहे; नव्हे ती जास्तच आहे, हे तिनं अनेकदा उघडपणे बोलून दाखवलं आहे. पण असंख्य क्रीडा चाहतेच काय तर दिग्गज खेळाडूही तिच्या या देशाबद्दलच्या निष्ठेवर शंका उपस्थित करून अनेकदा टीकेचा भडिमार करतात. या टीकाकारांना तिनं पुन्हा एकदा उत्तर दिलं आहे. पाकिस्तानच्या संघात खेळणारा पती शोएब मलिकला माझा पाठिंबा आहेच, पण माझा देशही माझ्यासाठी सर्वोच्च आहे, असं तिनं म्हटलंय.

चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून भारताला पराभूत व्हावं लागलं. यानंतर सानिया मिर्झानं पाकिस्तान संघाचं अभिनंदन करणारं ट्विट केलं. त्यानंतर लगेच भारताच्या हॉकी संघानं विजय मिळवल्याबद्दल भारतीय हॉकीपटूंचंही अभिनंदन केलं. पण तिच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली. याआधीही अनेकदा सानियाला भारतीय चाहत्यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे. तिच्या देशाप्रति असलेल्या निष्ठेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. इतकंच नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तान विरुद्ध इंग्लंडमध्ये झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्याला सानिया उपस्थित होती. यावरूनही अनेकांनी तिला लक्ष्य केलं. इतकंच नव्हे तर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानंही सानियाला पाकिस्तानी संघाची समर्थक असल्याचं संबोधलं होतं. पाकिस्तान-इंग्लंड सामन्याला उपस्थित राहणारी सानिया भारत-बांगलादेश सामन्यादरम्यान उपस्थित अनुपस्थित होती. यावरूनही चाहत्यांनी तिच्या देशाप्रति असलेल्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पण तिच्यावर होत असलेल्या आरोपांचं तिनं पुन्हा खंडन केलं आहे. माझा पतीला पाठिंबा आहेच, पण माझा देश सर्वोच्च आहे, अशी प्रतिक्रिया तिनं ‘ईएसपीएन’शी बोलताना दिली. भारत-पाकिस्तानच्या सामन्याकडे दोघांमधील युद्ध म्हणून पाहिलं जातं, पण तसं नाही, असंही ती म्हणाली. क्रिकेट हा खेळ आहे. त्याकडे खेळाच्या दृष्टीकोनातूनच पाहावं, असंही तिनं टीकाकारांना सुनावलं आहे.