बॉक्सिंगमधील राष्ट्रीय स्तरावर संघटनात्मक मतभेदांची झळ खेळाडूंना पोहोचली असली तरी रिओ ऑलिम्पिकमधील खराब कामगिरीस मीच जबाबदार आहे, असे राष्ट्रीय प्रशिक्षक गुरुबक्षसिंग संधू यांनी सांगितले.

ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात यंदा भारताला एकही पदक मिळविता आले नाही याचे दु:ख व्यक्त करीत संधू म्हणाले, ‘‘लोकांसाठी ही कामगिरी खराब असली तरी गेली चार वर्षे संघटना स्तरावर अस्थिरता आहे. अशा अडचणीतून आपले बॉक्सिंग क्षेत्र जात आहे. त्यातच आपल्या खेळाडूंना वरचढ प्रतिस्पर्धी मिळाले. हे लक्षात घेता खेळाडूंच्या कामगिरीस शंभर टक्के दोष देता येणार नाही. संघटनात्मक स्तरावरील मतभेद मिटतील व पुन्हा बॉक्सिंगला सुगीचे दिवस येतील अशी मी आशा करतो.’’

विजेंदरसिंग याने २००८ मध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यानंतर एम.सी. मेरी कोम हिने २०१२ मध्ये कांस्यपदक मिळवीत आणखी एक इतिहास घडविला होता. रिओ येथील स्पर्धेसाठी भारताचे तीनच स्पर्धक पात्र ठरले होते. त्यापैकी एक खेळाडू पदक मिळवील अशी अपेक्षा होती. मात्र भारताची पाटी कोरीच राहिली.

संधू यांनी सांगितले की, ‘‘भारतीय खेळाडू यंदा ज्या खेळाडूंविरुद्ध पराभूत झाले, त्या सर्व प्रतिस्पर्धी खेळाडूंनी नंतर पदकांचीही कमाई केली. शिवा थापा याला हरविणाऱ्या रोबेसी रामिरेझ या क्यूबाच्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. मनोजकुमार याला पराभूत करणाऱ्या फाझलिद्दिन गैब्नाझारोव यानेही सोनेरी यश मिळविले. विकास कृष्णन याच्यावर मात करणाऱ्या बेक्तेमिर मेलिकुझीनोव याला रौप्यपदक मिळाले. हे लक्षात घेता आपल्या खेळाडूंना यंदा तुलनेने खूप अवघड कार्यक्रम पत्रिका लाभली होती असेच म्हणावे लागेल.’’

भारतीय खेळाडू ज्या मानसिक अवस्थेतून जात आहेत, ते लोकांनी ओळखले पाहिजे. पालकच नाही तर मुले कशी चांगली कामगिरी करू शकतील. संघटकांनी मतभेद विसरून खेळाच्या व खेळाडूंच्या हिताचे रक्षण करण्यासाठी एकत्र आले पाहिजे. प्रभावी राष्ट्रीय संघटना असेल तरच खेळाडूंचा विकास होणार आहे. संघटना हा खेळाडूंचा भक्कम पाया असतो. पायाच ठिसूळ असेल तर इमारत कशी टिकणार.

गुरुबक्षसिंग संधू