आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील भारतीय क्रिकेट संघाच्या आत्तापर्यंतच्या प्रवासात स्मृती मंधाना, मिताली राज, वेदा कृष्णमूर्ती, पूनम राऊत व दीप्ती शर्मा ही मोजकीच नावे पुढे येत होती. मात्र गुरुवारच्या उपांत्य फेरीतील लढतीने सारे काही बदलून टाकले. संपूर्ण स्पर्धेत फलंदाजीची पुरेशी संधी न मिळालेल्या हरमनप्रीत कौरने गुरुवारी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली खेळी संस्मरणीय ठरली. कौरही याच संधीच्या शोधात होती आणि तिने ११५ चेंडूंत २० चौकार व ७ षटकारांची आतषबाजी करत नाबाद १७१ धावा चोपल्या. ‘‘स्वत:ला सिद्ध करायचे होते आणि त्यासाठी संधीच्या शोधात होती, ती ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळाली,’’ अशी प्रतिक्रिया कौरने सामन्यानंतर दिली.

भारताचे अव्वल दोन फलंदाज अवघ्या ३५ धावांवर माघारी परतल्यानंतर कौरने संयमी आणि अखेरच्या षटकांत आक्रमक खेळ करताना संघाला २८१ धावांचा पल्ला गाठून दिला. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव २४५ धावांत गडगडला आणि भारताने ३६ धावांनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.

‘‘संपूर्ण स्पर्धेत मला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. आज जेव्हा ती मिळाली, तेव्हा त्याचा पुरेपूर वापर करण्याचा माझा प्रयत्न होता, कारण स्वत:ला सिद्ध करण्याची हीच ती वेळ होती आणि जे काही मी ठरवले, ते प्रत्यक्षात उतरवण्यात यशस्वी झाले,’’ असे कौर म्हणाली.

या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताची कर्णधार मिताली राज (३९२) दुसऱ्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ भारतीयांमध्ये हरमनप्रीत कौर (३०८) आणि पूनम राऊत (२९५) यांचा क्रमांक येतो. भारताच्या कामगिरीविषयी कौर म्हणाली, ‘‘मिताली, दीप्ती आणि वेदा यांनी चांगली फलंदाजी केली आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत फलंदाजीसाठी उतरल्यावर चेंडूवर जोरदार फटकेबाजी करायची हाच निर्धार केला होता आणि तेच मी केले.’’