‘अभ्यासात चांगले नसणे ही गोष्ट खूप लाजिरवाणी मानली जाते. मात्र , मला त्याचा फायदाच झाला व त्यामुळेच माझी बॅडमिंटनमध्ये खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून दिमाखदार कारकीर्द घडली,’ असे मुख्य राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी सांगितले.

गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या सायना नेहवालने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले, तर यंदा रिओ ऑलिम्पिकमध्ये  पी.व्ही.सिंधूनेरौप्यपदकाची कमाई केली. गोपीचंद यांनी २००१ मध्ये ऑल इंग्लंड स्पर्धेत विजेतेपद पटकाविले व  स्पर्धात्मक खेळातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी हैदराबाद येथे प्रशिक्षण अकादमी सुरू केली.

गोपीचंद म्हणाले, ‘माझा भाऊ व मी  लहानपणापासूनच क्रीडा क्षेत्रात होतो. त्याने राज्यस्तरावर विजेतेपद मिळविले होते. त्यानंतर त्याने आयआयटी प्रवेशपरीक्षा दिली. त्यामध्ये तो उत्तीर्ण झाला व आयआयटीमध्ये प्रवेश घेतला. मी अभियांत्रिकीची परीक्षा दिली, मात्र त्यामध्ये अपयश आल्यानंतर मी बॅडमिंटनवरच अधिक लक्ष केंद्रित केले. मी बॅडमिंटन क्षेत्रात मिळविलेले यश पाहता अभ्यासात एकाग्रतेने लक्ष दिले नाही, याचे मला अजिबात दु:ख वाटत नाही.’

अकादमीची स्थापना करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबाबत सांगताना ते म्हणाले, ‘अकादमीचे सुरुवातीचे दिवस खूप कठीण गेले. अनेकांनी आर्थिक सहकार्याचा प्रस्ताव नाकारला. एका सार्वजनिक कंपनीकडून आर्थिक निधी मिळविण्यासाठी लागोपाठ तीन दिवस त्यांच्या मुख्यालयाच्या बाहेर दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५-३० या वेळेत मी बसून राहिलो होतो. तीन दिवसांनी या कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बॅडमिंटनकरिता आम्ही मदत देऊ शकत नसल्याचे सांगितल्यानंतर मी अक्षरश: रडलो. या अनुभवानंतर आपण कोणापुढेही हात पसरायचे नाहीत असे ठरविले. माझ्या कुटुंबीयांशी बोलून घर गहाण ठेवत अकादमीकरिता आर्थिक निधी उभा केला.  माझ्या अकादमीत प्रशिक्षण घेतलेल्या खेळाडूंपैकी एक-दोन खेळाडू एवढय़ा लवकर ऑलिम्पिक पदक मिळवतील असे स्वप्नही मी पाहिले नव्हते.’

पी.व्ही. सिंधू-मारिन  लढतीला प्रचंड प्रतिसाद

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील पी. व्ही. सिंधू आणि कॅरोलिन मारिन यांच्यातील महिला एकेरीची अंतिम लढत तब्बल १७.२ दशलक्ष प्रेक्षकांनी पाहिल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रक्षेपणकर्त्यां स्टार वाहिनीच्या हॉटस्टार या ऑनलाइन व्यासपीठाद्वारे ५ दशलक्षहून अधिक प्रेक्षकांनी सामन्याचा आस्वाद घेतल्याचे स्पष्ट झाले आहे

सिंधू, साक्षीचा दिल्ली सरकारकडून सत्कार

नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत रौप्यपदक जिंकणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि कांस्यपदक जिंकणारी कुस्तीपटू साक्षी मलिक यांचा बुधवारी दिल्ली सरकारकडून सत्कार करण्यात आला. दिल्ली सरकारकडून या दोघींना अनुक्रमे दोन व एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद आणि मनदीप सिंग यांना प्रत्येकी पाच लाख, तर टेबल टेनिसपटू मनिका बात्रा व ४ बाय ४०० मीटर रिले संघातील खेळाडू ललित माथूर यांना प्रत्येकी ३ लाख देण्यात आले. या वेळी सिंधूचे फिजिओ सुबोध व किरण चल्लागुंडला यांनाही गौरविण्यात आले. सिंधू आणि साक्षी यांनी या सोहळ्यात उपस्थित विद्यार्थ्यांशी मनमुराद गप्पा मारल्या.