युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी युवराजच्या दीडशतकी खेळीनंतर त्याचे कौतुक तर केलेच पण यावेळी महेंद्रसिंग धोनीवरही त्यांनी स्तुस्तीसुमने उधळली. युवराज संघाबाहेर जाण्यास महेंद्रसिंग धोनीच जबाबदार असल्याचे सांगत योगराज नेहमी धोनीवर वेळोवेळी शरसंधान साधत होते. योगराज यांनी आजवर धोनीवर अनेक आरोप देखील केले. पण युवराजने कटक सामन्यात धोनीसोबत रचलेल्या २५६ धावांच्या भागीदारीनंतर योगराज यांचा धोनीबद्दलचा सुर भलताच बदलेला दिसत आहे. युवराजने केलेल्या या दमदार कमबॅकवर ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना योगराज म्हणाले की, ज्यापद्धतीने युवी आणि धोनीने विकेटवर उभे राहून टीच्चून फलंदाजी केली हे वाखाणण्याजोगे आहे. धोनीने युवराजला खेळपट्टीवर दिलेल्या साथीनंतर त्याला माफ करण्यास मला भाग पाडले. दोघांनी एकमेकांना ज्यापद्धतीने साथ दिली यातून दोघांचे एकमेकांबद्दलचे आणि देशाबद्दलचे प्रेम स्पष्ट दिसून आले.

युवराज आणि धोनीने कटक वनडेत भारतीय संघ ३ बाद २९ असा बिकट अवस्थेत असताना चौथ्या विकेटसाठी तब्बल २५६ धावांची भागीदारी रचून संघाला ३८१ धावांपर्यंत मजल मारून दिली. योगराज म्हणाले की, माझा धोनीवर राग कधीच नव्हता. पण संघाचा कर्णधार म्हणून त्याने संघाची निवड होताना निवड समितीच्या बैठकीत युवराजच्या बाजूने ठाम उभे राहण्याची गरज होती. मला संघाची मधली फळी सांभाळण्यासाठी युवी हवाच हे त्यावेळी धोनीने ठामपणे सांगितले पाहिजे होते. तसे न केल्याने युवीच्या क्रिकेट करिअरची दोन ते तीन वर्षे वाया गेली. पण ‘देर आये लेकीन दुरूस्त आये’, असं म्हणायला हरकत नाही. युवीने अखेर कमबॅक केले आणि मी खूप आनंदी आहे. विराट कोहलीचे कौतुक करावे तितके कमीच आहे. विराटनेच युवीवर विश्वास दाखवल्यामुळे त्याचे पुनरागमन होऊ शकले आणि यापुढेही युवराज चांगली कामगिरी करत राहिल, असा विश्वास असल्याचेही योगराज पुढे म्हणाले.

 

युवराज लहान असताना मी त्याच्याशी खूप कठोर वागायचो. त्याच्याकडून मैदानात खूप घाम गाळून घ्यायचो. युवराजकडून मी असाच सराव करून घेत राहिले तर तो एकदिवस मृत्यूला कवटाळेल असेही काही जणांनी मला त्यावेळी म्हटले होते. पण माझ्या मुलामध्ये क्रिकेटमध्ये नवी उंची गाठण्याची कुवत असल्याची मला कल्पना होती. तो लहान असल्यापासूनच मी त्याच्या रोज दोन ते तीन तास कसून सराव करून घ्यायचो. त्यामुळे आज युवराजच्या वाढत्या वयाची मला अजिबात चिंता वाटत नाही. कारण लहानपणापासूनच कसून सरावाची सवय असल्याचे त्याचा फिटनेस खूप उच्च दर्जाचा आहे. तुम्ही स्वत: फिट कसे राखता यावर तुमच्या करिअरची दिशा अवलंबून आहे. ज्याप्रमाणे युवी, धोनी आणि कोहली सध्या खेळत आहेत त्याचा आढावा घेता ते वयाच्या ४० व्या वर्षापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतात असा मला विश्वास आहे, असेही योगराज म्हणाले. युवराजने भारतासाठी आजवर अनेक महत्त्वाचे सामने जिंकून दिले आहेत. पण गेल्या काही वर्षांत त्याचा बराच वेळ वाया गेला याची मला जास्त खंत आहे. युवराजचा संघात समावेश असता तर आपण २०१५ सालचा विश्वचषक देखील जिंकू शकलो असतो आणि धोनीवरचं ओझं देखील हलके होण्यास नक्कीच मदत झाली असती, असेही योगराज म्हणाले.