युवा खेळाडूंसाठी डेव्हिस चषकात भारताचे प्रतिनिधित्व करणे हा अभिमानास्पद क्षण असेल. त्यांच्याकडे अनुभवाची कमी असेल, पण त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी असल्याचे उद्गार भारताचा अनुभवी खेळाडू लिएण्डर पेसने काढले. त्यांच्यापुढील आव्हान खडतर असल्याचेही पेसने पुढे सांगितले.
‘अशी परिस्थितीत आम्ही याआधीही खेळलो आहोत. मोठय़ा आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्याचे युवा खेळाडूंवर दडपण येणे साहजिक आहे, मात्र मी माझ्या अनुभवाचा उपयोग करून हे दडपण कमी करण्याचा प्रयत्न करेन, असे पेसने सांगितले. सामन्याच्या दिवशी एखादा खेळाडू दडपण कसे हाताळतो यावर सारे काही अवलंबून आहे. दडपण झुगारून देऊन सर्वोत्तम प्रदर्शन कसे करावे यासंदर्भात युवा खेळाडूंनी मी युक्तीच्या चार गोष्टी सांगणार आहे, असे पेसने सांगितले. सराव शिबिरात पेसने दुहेरीतील साथीदार पुरव राजाच्या साथीने मंगळवारी दोन तास सराव केला.