विजेतेपदाच्या उंबरठय़ावरुन चार वेळा परतावे लागले असले तरी हा पराभव आता इतिहासजमा झाला आहे. मी यंदा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारच, असे इंग्लंडच्या अँडी मरेने येथे सांगितले. मरेला रविवारी येथील अंतिम फेरीत नोव्हाक जोकोव्हिच याच्याशी सामना करावा लागणार आहे.

जोकोव्हिचने मरेला ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत २०११, २०१३ व २०१५ मध्ये पराभूत केले होते. तसेच मरेला रॉजर फेडररने २०१० च्या अंतिम लढतीत पराभूत केले होते. जोकोव्हिचने या स्पर्धेची पाच जेतेपदे नावावर केली आहेत.

मरे म्हणाला की ,‘‘मी विजेता होईन अशी अपेक्षा फार लोक करीत नाहीत, याची मला खात्री आहे. जोकोव्हिचचे पारडे जड आहे याचीही मला कल्पना आहे. सहाव्यांदा विजेतेपद मिळवीत विक्रम करण्यासाठी उत्सुक असलेल्या जोकोव्हिचला पराभूत करण्याचेच माझे ध्येय आहे. पूर्वी काय घडले याची चिंता मी करीत नाही. आता फक्त अंतिम सामन्यावर मी लक्ष केंद्रित केले आहे.’’

जेमी मरे-ब्रुनो सोरेस यांना अजिंक्यपद

अँडी मरेचा भाऊ जेमी मरे आणि ब्रुनो सोरेस जोडीने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावले. या जोडीने डॅनियल नेस्टर आणि राडेक स्टेपानेक जोडीवर २-६,

६-४, ७-५ असा विजय मिळवला. ८२ वर्षांंनंतर या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा जेमी इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला.