डेव्हिड वॉर्नर हा जो रुट, स्मिथ आणि कोहलीप्रमाणेच कसोटीतील आघाडीचा फलंदाज आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी व्यक्त केले. सध्याच्या घडीला कसोटी क्रिकेटमधील आघाडीच्या फलंदाजामध्ये स्मिथ, रुट आणि कोहली यांची तुलना होताना दिसते. मात्र वॉर्नर हा देखील आघाडीचा फलंदाज आहे, यावर त्यांनी जोर दिला. त्याच्यासोबतच त्यांनी न्यूझीलंडच्या केन विलियम्सनची कसोटीतील फलंदाजी अफलातून असल्याचा उल्लेख केला आहे.

‘ईएसपीएन’साठी लिहिलेल्या लेखात म्हटलंय की, कसोटी क्रमवारी ही फलंदाजीच्या सरासरीवर ठरवली जाते. विलियम्सनची कसोटीमधील सरासरी स्मिथनंतर दुसऱ्या स्थानी आहे. पण त्याचा आघाडीच्या कसोटी फलंदाजामध्ये उल्लेख केला जात नाही. अशीच काहिशी अवस्था डेव्हिड वॉर्नरची आहे. त्याची भारतातील कामगिरी खराब असल्यामुळे आघाडीच्या कसोटीपटूमध्ये त्याला स्थान दिले जात नाही. ज्याप्रमाणे वॉर्नर भारतीय खेळपट्टीवर अपयशी ठरला आहे. त्याचप्रमाणे विराट कोहली इंग्लंडमध्ये अपयशी ठरला. वॉर्नर आणि विराट यांच्या कसोटीतील सरासरीमध्ये अधिक अंतर नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय.

कसोटी क्रिकेटमध्ये वॉर्नरने ६६ सामन्यांत ४७.९४ च्या सरासरीने ५ हजार ७०५ धावा केल्या आहेत. यात २० शतके आणि २४ अर्धशतकांसह एका द्विशतकाचा समावेश आहे. कोहलीने १७ शतकं, १४ आणि ४ द्विशतकांच्या मदतीनं कसोटीमध्ये ६० सामन्यांत ४९.५५ च्या सरासरीनं ४ हजार ६५८ धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये सध्याच्या घडीला वॉर्नर पाचव्या स्थानावर असून त्याच्यानंतर सहाव्या क्रमांकावर विराटचा नंबर लागतो.