आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) अव्वल कसोटी संघाच्या बक्षिसाच्या रकमेमध्ये दुप्पट वाढ केली आहे. यापूर्वी अव्वल कसोटी संघाला पाच लाख अमेरिकन डॉलर एवढी रक्कम मिळत होती. आता या संघाला दहा लाख अमेरिकन डॉलर एवढी रक्कम मिळणार आहे. हे निर्णय पुढील वर्षांमध्ये एप्रिलपासून लागू होणार आहेत. या निर्णयाबरोबरच आयसीसीने महिला क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
‘‘बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय झाले असून २०१६ ते २०२३पर्यंतच्या आयसीसीच्या पुरुष आणि महिलांच्या स्पर्धासाठी सहा कोटी ५० लाख डॉलरची बक्षिसे देण्यात येणार आहेत. बक्षिसांच्या रकमेमध्ये गेल्या आठ वर्षांच्या तुलनेत तब्बल ४१ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे,’’  असे आयसीसीने पत्रकात म्हटले आहे.

‘‘वर्षांतील सर्वोत्तम कसोटी संघाची रक्कम दुपटीने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील वर्षांपासून अव्वल कसोटी संघाला पाच लाखऐवजी दहा लाख अमेरिकन डॉलरएवढी रक्कम देण्यात येणार आहे. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटच्या निधीसाठी ७ कोटी डॉलर एवढी रक्कम देण्यात येणार आहे. कसोटी खेळणाऱ्या संघांनी २०२३ पर्यंत स्पर्धा भरवण्यासाठी ही रक्कम देण्यात येणार असून यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या मंडळाचा समावेश नसेल,’’ असे आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्पर्धा अधिक वाढाव्या यासाठी आयसीसीने काही ठोस पावले उचलण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यानुसार संलग्न आणि मान्यताप्राप्त सदस्यांच्या निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी संलग्न आणि मान्यताप्राप्त सदस्यांना क्रिकेटच्या विकासासाठी १२ कोटी ५० लाख डॉलर एवढा निधी मिळत होता. आता २०१६ ते २०२३ या कालावधीसाठी त्यांना २० कोटी ८० लाख डॉलर एवढा निधी देण्यात येणार आहे. या वेळी संलग्न सदस्यांच्या निधीच्या ढाच्यामध्ये बदल करण्यात आला आहे. २०१५ वर्षांसाठी त्यांना दोन कोटी डॉलर देण्यात आले होते. पुढील वर्षांसाठी या निधीमध्ये वाढ करण्यात आली असून २०१६ वर्षांसाठी त्यांना २ कोटी ६० लाख डॉलर एवढा निधी देण्यात येणार आहे. अमेरिकेमध्ये क्रिकेटचा विकास आणि प्रसार करण्यासाठी आयसीसी कटिबद्ध असून अमेरिका क्रिकेट असोसिएशनबाबतचा (यूएसएसीए) निर्णय जून महिन्यामध्ये घेण्यात येणार आहे. अमेरिकेत क्रिकेटशी निगडित विकास करण्यात आयसीसी उत्सुक असून यापुढे क्रिकेटच्या विकासासाठी ठोस पावले उचलण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अमेरिकेतील समभागधारकांचे एकीकरण करण्याचे कामही आयसीसी करणार आहे.

आयसीसीचा आगामी १९ वर्षांखालील विश्वचषक बांगलादेशमध्ये खेळवण्यात येणार असल्याचे समजते आहे. २०१५च्या विश्वचषकापासून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पंचांचे आयसीसीने या वेळी अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर अवैध गोलंदाजीच्या शैलीबाबत केलेल्या कामाचीही आयसीसीने दखल घेत पाठिंबा दर्शवला आहे.

आयसीसीच्या २०१६-२०२३ या कालावधीमध्ये होणाऱ्या महिल्यांच्या सहा स्पर्धाच्या रक्कमेमध्येही आयसीसीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या कालावधीमध्ये महिलांना चार कोटी ४० लाख डॉलर एवढी एकूण बक्षिसे देण्यात येणार आहेत. यामध्ये २०१७ साली होणाऱ्या महिला विश्वचषकाचाही समावेश आहे. २०१७ मधील विश्वचषक इंग्लंडमध्ये होणार असून तो राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. या पद्धतीनुसार चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.

महिलांसाठी आयसीसीची अजिंक्यपद स्पर्धा २०१७ सालानंतर खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेमुळे महिला क्रिकेटचा दर्जा सुधारत असून त्यामुळे प्रत्येक संघाला दोन वर्षांच्या कालावधीमध्ये किमान २१ एकदिवसीय सामने खेळण्याची हमी असेल. सध्या होणारी अजिंक्यपद स्पर्धा ही आगामी विश्वचषकासाठी महत्त्वाची असून यामधील अव्वल चार संघांना थेट विश्वचषकात खेळण्याची संधी मिळणार आहे.

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटसाठी आयसीसीचे प्रयत्न
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाची मागणी जोर धरू लागली आहे. या पाश्र्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेशी (आयओसी) चर्चा करणार आहेत. गुवांगझोऊ (चीन) आणि इन्चॉन (दक्षिण कोरिया) येथे झालेल्या मागील दोन आशियाई क्रीडा स्पध्रेत ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेचा समावेश होता. आयसीसीचे संचालक गाइल्स क्लार्क, मुख्य कार्यकारी डेव्हिड रिचर्डसन हे आयओसीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.

श्रीनिवासन भारताचे प्रतिनिधी, मनोहर गैरहजर
आयसीसीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीला कार्याध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी भारताचेही प्रतिनिधित्व केले. बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष शशांक मनोहर या बैठकीला उपस्थित राहिले नाही. आयसीसीच्या पत्रकात श्रीनिवासन यांच्या नावाचा कार्याध्यक्ष आणि भारताचे प्रतिनिधी या दोन्ही ठिकाणी उल्लेख आहे.