चॅम्पियन्स कंरडक स्पर्धेत दमदार फलंदाजीनंतर भारतीय फलंदाजांचे  कंबरडे मोडणाऱ्या पाकिस्तानी संघाचे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि पाकिस्तान मुस्लिम लीगचे प्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी कौतुक केले आहे. हिरव्या जर्सी घालून इंग्लंडच्या मैदानात दमदार कामगिरी करणाऱ्या पाकिस्तानी संघाचा आम्हाला अभिमान असल्याचा उल्लेख त्यांनी ट्विटमध्ये  केला आहे. या ट्विटसोबत त्यांनी पाकिस्तानी संघाचा जल्लोष करतानाचा एक फोटो देखील शेअर केला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी एम नझीब यांनी पाकिस्तानी संघाला शुभेच्छा दिल्या होत्या. नझीब यांचे हे ट्विट रिट्विट करत मुशर्रफ यांनी पाकिस्तानी संघाला शुभेच्छा दिल्या होत्या. या ट्विटमध्ये लिहल होते की, पाकिस्तानने स्पर्धेत विजय मिळवून इतिहास आणखी उजळ करावा. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिल्यांदाच अंतिम सामना रंगला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मागील दहा वर्षातील आकडेवारीमुळे भारतीय संघ पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभवाचा धक्का देईल, अशी आशा तमाम भारतीयांना होती. मात्र, या सामन्यात पाकिस्तानने दमदार कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतासमोर ३३९ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. या धावसंख्येचा पाठलाग करण्यास मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. लयात असणारा रोहित शर्मा खातेही खोलू शकला नाही. त्यानंतर मैदानात आलेला कर्णधार विराट कोहली स्वस्तात माघारी परतला. ही जोडी परतल्यानंतर भारतीय संघाची मदार ही शिखर धवन आणि युवराज सिंगवर आली. मात्र शिखर धवननेही पाकिस्तानी गोलंदाजीसमोर निराश केले.

पाकिस्तानी गोलंदाजांनी अचूक मारा करत भारताच्या भक्कम फलंदाजीला सुरुंग लावला. भारताचा निम्मा संघ तंबूत परतल्यानंतर पाकिस्तानी विजयाच्या आशा पल्लवित होताच मुशर्रफ यांनी संघावर कौतुकाचा वर्षाव केला. त्यांनी ट्विटमध्ये लिहलयं की, हिरव्या जर्सीतील पाकिस्तानी संघ कमालीची कामगिरी करत असून या संघाचा आम्हाला अभिमान आहे. पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदावर असताना परवेझ मुशर्रफ यांनी अनेकदा भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान मैदानात  हजेरी लावल्याचे दिसले आहे.