चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघाला यंदा लोळवणारचं असं विधान केल्यानंतर कोलांटीउडी घेत स्पर्धेत भारताला हरवणं हे मुख्य लक्ष्य नसल्याचं पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इंझमाम-उल-हकने म्हटलं आहे. केवळ भारताला हरवण्यासाठी पाकिस्तानचा संघ इंग्लंडला जाणार नसून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणं हे आमचं मुख्य लक्ष्य आहे, असे इंझमामने म्हटले. इंझमाम पाकिस्तान क्रिकेट संघाचा निवड समितीचा अध्यक्ष आहे.
पाकिस्तानने याआधी २००४ साली माझ्या नेतृत्त्वात चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाला पराभूत केलं असल्याचीही आठवण इंझमामने करून दिली. आम्ही पुन्हा एकदा जिंकू शकतो, असा विश्वासही इंझमामने व्यक्त केला.

येत्या १ जूनपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरूवात होणार आहे. ४ जूनला भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्याआधी पाकिस्तानचा संघ सराव शिबीराला देखील उपस्थित राहणार आहे. पाकचा संघ दोन सराव सामने खेळणार आहे. पहिला सराव सामना २७ मे रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे, तर दुसरा सामना २९ मे रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध असणार आहे.

इंझमामने काही दिवसांपूर्वी आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानची भारतीय संघाविरुद्धची कामगिरी आजवर चांगली राहिली नसली तरी प्रत्येक दिवस हा नवा असतो. यावेळी आमचे खेळाडू नक्कीच उल्लेखनीय कामगिरी करून भारताला पराभूत करतील असा विश्वास आहे, असे म्हटले होते.

वर्ल्डकप स्पर्धेत आजवर पाकिस्तानला भारतीय संघावर मात करता आलेली नाही. तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकने भारताला दोन वेळा पराभूत केले आहे. २००४ साली एजबस्टन येथे झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारतावर मात केली होती. याच स्टेडियमवरच यंदा भारत विरुद्ध पाकिस्तान लढत होणार आहे.