इंग्लंडमध्ये १ जूनपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होणार आहे. पण मंगळवारी मँचेस्टरच्या अरिना येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवरही दहशतवादी हल्ल्याचे सावट निर्माण झाले आहे. मँचेस्टरमध्ये आज झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडला रवाना होणाऱ्या भारतीय संघाच्या सुरक्षेबाबत बीसीसीआयने तातडीची बैठक बोलावली. बुधवारी भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. बीसीसीआयने याआधी आज बैठक बोलावून भारतीय संघाच्या सुरक्षेचा आढावा घेतला.

भारतीय संघाच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय बैठकीत घेतल्याचे समजते. भारतीय संघाचा पहिला सामना ४ जून रोजी पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत होणार आहे. त्याआधी भारतीय संघ २६ आणि ३० मे रोजी सराव सामने खेळणार आहे. मँचेस्टरच्या अरिना येथे ज्या ठिकाणी स्फोट झाला तेथून ओव्हल क्रिकेट स्टेडियम ३५० किमी अंतरावर आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या सुरक्षेबाबत काळजी बाळगली जात आहे.