गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला आयसीसी मान्यता देण्याच्या तयारीत आहे. याविषयी न्यूझीलंडमध्ये आयसीसीची एक महत्वाची बैठक पार पडली जाणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातलं वृत्त जाहीर केलं आहे. वन-डे आणि टी-२० क्रिकेटच्या जमान्यात कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देणं गरजेचं असल्याचं आयसीसीचं मत होतं, मात्र स्पर्धेचा आराखडा आणि इतर काही बाबींचा मेळ जुळून न आल्याने हा प्रयत्न मागे पडला. मध्यंतरी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा बंद करुन त्या कालावधीत कसोटी अजिंक्यपद स्पर्धा राबवण्याचा आयसीसीचा विचार होता. मात्र काही देशांनी याला विरोध केल्यामुळे आयसीसीने हा प्रयत्न थांबवला.

सिडनी मॉर्निंग हेराल्ड या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनूसार, ९ संघांचा सहभाग असलेल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या आराखड्याला शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत आयसीसी मान्यता देण्याच्या तयारीत आहे. २०१९ साली ही स्पर्धा सुरु होऊन, आगामी २ वर्षाच्या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाईल अशी प्राथमिक माहिती सध्या समोर येते आहे. दोन देशांमध्ये खेळवल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेऐवजी, अजिंक्यपद स्पर्धा कसोटी क्रिकेटसाठी फायदेशीर ठरु शकेल; असं वक्तव्य क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष जेम्स सदरलँड यांनी केलं आहे.

कसोटी क्रिकेटकडे प्रेक्षकांचा ओढा वाढला जावा यासाठी आयसीसीने दिवस-रात्र कसोटी सामन्यांना सुरुवात केली. अजिंक्यपद स्पर्धेसाठी ४ दिवसांचे कसोटी सामने खेळवण्याचा प्रस्तावही समोर आला होता, मात्र काही देशांनी याला आपला विरोध दर्शवला. या स्पर्धेसाठी आयसीसी आपल्या वार्षिक वेळापत्रकात बदल करणार असल्याचंही समजतंय. ५ सामन्यांच्या वन-डे मालिका संपवून यानंतर ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळवण्याचा आयसीसीचा विचार आहे.

अवश्य वाचा – आयसीसीच्या नव्या नियमांमुळे धवन आणि फिंच संभ्रमात