आयसीसीच्या प्रस्तावित आर्थिक संरचनेचे चित्र; पाकिस्तानात सामने आयोजित करण्यासाठी आयसीसीचा पुढाकार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवरील (आयसीसी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) वर्चस्व खालसा होणार असल्याचे बुधवारी झालेल्या बैठकीत स्पष्ट झाले. सध्याच्या आर्थिक रचनेनुसार बीसीसीआयला आयसीसीकडून प्रतिवर्षी ५७ कोटी डॉलर्स एवढी घसघशीत रक्कम मिळते. नव्या रचनेनुसार ही रक्कम २९ कोटी ३० लाख डॉलर्स एवढी कमी होणार आहे. मात्र तरीही अन्य संलग्न सदस्यांच्या तुलनेत बीसीसीआय प्रमुख लाभार्थी असेल हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नामुष्कीनंतरही बीसीसीआयचे पारडे जडच राहील हे उघड आहे.

प्रस्तावित अंदाजपत्रकानुसार इंग्लंड क्रिकेट मंडळाला १४ कोटी ३० लाख डॉलर्स, सात पूर्ण सदस्यीय मंडळांना १३ कोटी २० लाख डॉलर्स, तर झिम्बाब्वे क्रिकेटला ९ कोटी ४० लाख डॉलर्स एवढी रक्कम मिळणार आहे. सहसदस्य बोर्डाना २८० दशलक्ष डॉलर्स एवढी रक्कम मिळणार आहे. बीसीसीआयने हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. निवडणुकीत १३ विरुद्ध १ अशा फरकाने बदलाला मंजुरी मिळाली.

संघटनेच्या नव्या संविधानासाठी मतदान झाले. आयसीसीच्या सर्व सदस्य मंडळाच्या प्रतिनिधींपुढे संविधानाचा मसुदा मांडण्यात येईल. नव्या संविधानाच्या बाजूने १२-२ असे मतदान झाले. जूनमध्ये होणाऱ्या संघटनेच्या बैठकीत नवा मसुदा मंजुरीसाठी मांडण्यात येईल.

‘‘नव्या संरचनेनुसार सुशासन, आयसीसीची कार्ये आणि भूमिका यासंदर्भात सुस्पष्टता येईल. स्वतंत्र महिला संचालक आणि उपकार्याध्यक्षाची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. नव्या संरचनेत सर्व सदस्यांना समान मताधिकार मिळेल,’’ असे आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

आर्थिक संरचना आणि घटनात्मक बदल या दोन्ही मुद्यांवर बीसीसीआयवर नामुष्की ओढवली आहे. यामुळे इंग्लंडमध्ये आयोजित चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतून भारतीय संघ माघार घेण्याची चर्चा आहे. तसे झाल्यास या स्पर्धेचे वेळापत्रक कोलमडू शकते. तसेच स्पर्धेच्या अर्थकारणावर  विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानात जागतिक संघ खेळणार?

सुरक्षा आणि आर्थिक मुद्दय़ांच्या पडताळणीनंतर पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्याचा प्रस्ताव आयसीसीच्या विचाराधीन आहे. जागतिक संघ विरुद्ध पाकिस्तान अशी ट्वेन्टी-२० मालिका आयोजित करण्यासाठी आयसीसी प्रयत्नशील आहे. २००९ मध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. यानंतर झिम्बाब्वेचा संघ वगळता एकाही संघाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही.पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेची अंतिम लढत पाकिस्तानात झाली होती.