इंग्लंडमध्ये रंगलेल्या महिला विश्वचषकात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. अखेरच्या क्षणात संघ दबावात आल्यामुळे ऐतिहासिक विजयापासून महिला दूर राहिल्या. मात्र आ विश्वचषकात भारतीय महिलांच्या क्रिकेटला दाद मिळाली. इंग्लंडमध्ये इतिहास घडवणे शक्य झाले नसले तरी विश्वचषकात अनेक विक्रम प्रस्थापित करुन महिलांनी लक्षवेधी कामगिरी केली. विश्वचषकातील पाच विक्रमामध्ये भारतीय कर्णधार मितालीच्या दोन विक्रमांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा
विश्वचषकात सातत्यपूर्ण खेळी करणाऱ्या मितालीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक धावा बनवण्याचा करिश्मा केला. विश्वचषक स्पर्धेदरम्यान तिने सर्वोच्च धावसंख्या गाठली. इंग्लंडची माजी क्रिकेटर एडवर्डसचा ५९९२ धावांचा विक्रम मोडीत काढून मितालीने सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली. विश्वचषक स्पर्धेत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या उभारणे, हा एक विक्रमच आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८३ व्या सामन्यात तिने एडवर्डसला मागे टाकत हा विश्वविक्रम प्रस्थापित केला. डावाच्या २९ व्या षटकातील पेरीच्या चौथ्या चेंडूवर तिने एक धाव घेत एडवर्डला मागे टाकले.

सर्वाधिक अर्धशतके
सलामीच्या सामन्यातील अर्धशकी खेळीने मितालीने चार्ल्स एडवर्डच्या सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम मोडीत काढला. सलामीच्या सामन्यात भारताने इंग्लंडला ३५ धावांनी पराभूत केले. या सामन्यात भारताची सलामीवीर स्मृती मंधानाने दमदार ९० धावा केल्या होत्या. संघाला सुस्थितीत असताना मैदानात उतरलेल्या मितालीने ७३ चेंडूत ७१ धावांची खेळी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके मितालीच्या नावे आहेत. तिच्या नावावर सध्या ४९ अर्धशतके आहेत.

सलग सात अर्धशतके
मिताली राजने विश्वचषकात नोंदवलेल्या विक्रमामध्ये सातत्यपूर्ण खेळीने सलग सात अर्धशतके ठोकण्याचा पराक्रम केला. ७०*, ६४, ७३*, ५१*, ५४, ६२* आणि ७१ अशी धावसंख्या करत तिने सातत्यपूर्ण अर्धशतकी खेळी करण्याचा करिश्मा केला.

एकही धाव न देता चार विकेट्स
ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिज यांच्यातील सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या डेन वॅन निकर्कने अनोखा विक्रम केला. तिने ३.२ षटकात एकही धाव न देता ४ विकेट्स घेतल्या. तिच्यासारखा करिश्मा महिला क्रिकेटमध्येच नव्हे तर पुरुष क्रिकेटमध्येही कोणीच करु शकलेलं नाही. या सामन्यात वेस्टइंडिजचा महिला संघ ४८ धावांत गारद झाला होता. वेस्ट इंडिजने दिलेले हे लक्ष दक्षिण आफ्रिकन महिलांनी ६.२ षटकात एकही विकेट्स न मिळवता पार केले.

या विश्वचषकातील सर्वोच्च वैयक्तिक धावासंख्या
यंदाच्या विश्वचषकात श्रीलंकेच्या चामरी अट्टापटू हिने सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. ऑस्ट्रेलियविरुद्धच्या सामन्यात तिने १७८ धावांची खेळी केली. विश्वचषकात सर्वाधिक धावसंख्या करण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियन कर्णधार बेलिंडा क्लार्क हिच्या नावावर आहे. तिने १९९७ च्या विश्वचषकात १५५ चेंडूत २२९ धावांची द्विशकी खेळी केली होती. भारताच्या दिप्ती शर्माने आयर्लंडविरुद्ध १८८ धावा केल्या होत्या. यंदाच्या विश्वचषकात हरमनप्रीतने १७१ धावांची तुफान खेळी केली होती. तिने सहारा टेलरशी बरोबरी केली. टेलरने २००३ च्या विश्वचषकात १७१ धाव केल्या होत्या.