भारतीय संघाची सलामीवीर पुनम राऊतने अंतिम सामन्यात दमदार खेळी केली. लेकीच्या या खेळीचा तिच्या वडिलांना अभिमान आहे, मात्र भारताला मिळालेल्या पराभवामुळे त्यांचा आनंद ओसरला आहे. पुनमच्या खेळीचा अभिमान वाटतो, पण भारतीय संघाच्या पराभवाने दु:ख झाले, अशी भावना राऊत यांनी व्यक्त केली. मितालीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला अटीतटीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात पुनमने विक्रमी खेळी केली. महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात झंजावत अर्धशतकी खेळी केली. शतकाच्या जवळ असताना ती पायचित होऊन माघारी फिरली. स्मृती मंधाना खातेही न उघडता माघारी फिरल्यानंतर भारतीय संघावर दबाव निर्माण झाला. त्यानंतर संयमी खेळी करत तिने भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. अंतिम सामन्यात पुनमने ११५ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ८६ धावांची खेळी केली. या सामन्यात अर्धशतक करताच तिने विक्रमाला गवसणी घातली. तिने ७५ चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. तिच्या कारकिर्दीतील हे १० अर्धशतक आहे. विश्वचषकाच्या एका सत्रात तीनहून अधिकवेळा पन्नासहून अधिक धावसंख्या उभारण्याचा करिश्मा करणारी पुनम एकमेव भारतीय आहे. याशिवाय पुनम विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात षटकार लगावणारी दुसरी महिला ठरली. यापूर्वी होकले या सलामवीर खेळाडूने अंतिम सामन्यात षटकार खेचण्याचा करिश्मा केला होता.

विशेष म्हणजे पुनमने सलामीच्या इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यातही ८६ धावांची खेळी केली होती. त्यानंतर वेस्ट इंडिज विरुद्ध तिला खाते ही उघडता आले नाही. पाकिस्तान विरुद्ध अर्धशतकाच्या उंबरठ्यावर तिने तंबूचा रस्ता पकडावा लागला. पाकिस्तानविरुद्ध तिने ४७ धावांचे योगदान दिले. त्यानंतर श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेसोबतच्या सामन्यात तिला मैदानात फारसा तग धरता आला नाही. या दोन सामन्यात तिने अनुक्रमे १६ आणि २२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तिने पुन्हा दमदार शतक ठोकले. ही शतकी खेळी देखील व्यर्थ ठरली होती. भारताला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात (४) आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात तिने १४ धावांची खेळी केली होती.