भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज हरमनप्रीत कौरने उपांत्य सामन्यात नाबाद शतकी खेळी केली. तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळीने क्रिकेट जगतात एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित झाला आहे. नॉक आऊट सामन्यात डावाला सुरुवात न करता मध्यल्या फळीत येऊन सर्वाधिक धावा करण्याचा करिष्मा हरमनप्रीतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात केला. हरमनप्रीत महिला आणि पुरुष क्रिकेटमध्ये नॉक आऊट सामन्यात सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. पुरुष क्रिकटमध्ये देखील असा कारनामा कोणीही केलेला नाही. विशेष म्हणजे हरमनप्रीत दोन गडी बाद झाल्यानंतर मैदानात आली होती. सलामीची जोडी परतल्यामुळे भारतीय संघाची अवस्था बिकट झाली होती. मात्र कठीण परिस्थितीत संयमी खेळ करत तिने मैदानात जम बसवला. दिवस आपला असल्याचे दाखवून देत तिने सहावेळा जगज्जेता असणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघातील गोंलदाजीला हतबल ठरवले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीतने १७१ धावांची नाबाद खेळी केली. यात तिने २० चौकार आणि ७ षटकार खेचले. भारताकडून यापूर्वी सौरव गांगुलीने नॉकआऊट सामन्यात १४१ धावांची खेळी केली होती. अर्थात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीत क्रिकेटमधील दादाचा विक्रम मागे टाकत भारताकडून नॉक आऊट सामन्यात सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे. सौरव गांगुलीने २००० मध्ये हा करिष्मा केला होता. हरमनप्रीतने तब्बल १७ वर्षानंतर अबाधित असणारा विक्रम मोडीत काढला.

हरमनप्रीतच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. यापूर्वी भारतीय संघाने २००५ मध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. २००५ मधील संघापेक्षा सध्याचा संघ नवा आहे. कर्णधार मिताली राज आणि झुलन गोस्वामी वगळता यावेळी एकही खेळाडू सध्याच्या संघात नाही. नव्या दमाच्या खेळाडूंच्या बळावर यजमानांना पराभूत करुन भारतीय संघ विश्वचषकावर नाव कोरण्यास उत्सुक असेल.