आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने भारतावर ९ धावांनी मात केली. चांगली सुरुवात, भक्कम भागीदारी करुनही मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारतीय महिलांना पराभवाचा सामना करावा लागला. सामना संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भारताची कर्णधार मिताली राजने या पराभवाचं कारण सांगितले.

“सामन्यात एका क्षणाला आम्ही वरचढ होतो, मात्र मोक्याच्या क्षणी आम्ही घाईगडबडीत चुका केल्या, त्यामुळेच इंग्लंडला आमच्यावर विजय मिळवणं सहज शक्य झालं. पराभव जरी पदरात पडला असला तरीही मला माझ्या संघाचा मनापासून अभिमान आहे. या सामन्यात आपलं आव्हान कायम राखणं हे सोप्पं नव्हतं, मात्र इंग्लंडच्या संघाने अखेरच्या क्षणापर्यंत हार न मानता प्रयत्न सोडले नाहीत. त्यामुळेच आज इंग्लंड विजयी झाले”. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मिताली राजने अंतिम फेरीत भारताच्या पराभवाचं कारण स्पष्ट केलं.

आपल्या संघातल्या प्रत्येक खेळाडूने केलेल्या खेळाचा आपल्याला अभिमान आहे. समोरचा संघ कितीही तुल्यबळ असला तरीही त्यांनी लगेच आपली हार मानली नाही, यामुळेच या स्पर्धेत आम्ही चांगली कामगिरी करु शकलो. यापुढेही काही वर्ष आपण क्रिकेट खेळणार असल्याचं सांगत आगामी विश्वचषकात मात्र आपण नक्की खेळणार नसल्याचं, मिताली राज म्हणाली.

इंग्लंडने दिलेलं २२९ धावांचं आव्हानही भारतीय संघाला पेलवलं नाही. पुनम राऊत बाद झाल्यानंतर एकामगोमाग एक फलंदाज तंबूत परतत राहिल्या आणि इंग्लंडने भारतावर ९ धावांनी मात करत विश्वचषकावर आपलं नावं कोरलं. या सामन्यात पुनम राऊत आणि हरमनप्रीत कौर यांनी झुंजार खेळाचं प्रदर्शन केलं, मात्र मधल्या फळीतल्या फलंदाजांची त्यांना न दिलेल्या साथीमुळे भारताला विश्वचषकाच्या स्वप्नावर पाणी सोडावं लागलं.