मर्यादित षटकांच्या खेळात भारत सध्या सर्वोत्तम कामगिरी करत असून संघाचे संचालक रवि शास्त्री यांनी भारताला विश्वचषक जिंकण्यासाठी आपली विजयी घोडदौड कायम ठेवावी लागेल, असे मत व्यक्त केले. भारत आपला विजयरथ विश्वचषक स्पर्धेतही कायम राखेल असा आशावाद शास्त्री यांनी यावेळी व्यक्त केला.
भारताचा संघ समतोल असून खेळाडू देखील चांगल्या फॉर्मात आहेत. त्यामुळे संघाला विजयाची जणू सवय झाली आहे आणि यामध्ये सातत्य राखणे गरजेचे आहे, असे रवि शास्त्री म्हणाले. स्पर्धेतील प्रत्येक सामना हा संघासाठी महत्त्वाचा असणार आहे. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धा जिंकण्यासाठी संघातील सहा ते आठ खेळाडू चांगल्या फॉर्मात असणे महत्त्वाचे असते. विराट कोहली सध्या उत्तम खेळ करत आहे. रोहित, धवन, युवराज आणि धोनी यांनीही चांगली फलंदाजीची केली आहे. त्यामुळे भारतच विश्वचषक विजयाचा दावेदार असल्याचा ठाम विश्वास शास्त्री यांनी व्यक्त केला.