ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठीच्या भारतीय संघातील निवडीचा जॅकपॉट लागल्यापासून हार्दिक पंड्या क्रिकेट रसिकांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. मैदानावरील त्याचा सळसळता उत्साह पाहून युवराज सिंगने त्याची तुलना थेट विंडीजच्या खेळाडुंशी केली होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस माझा खरा आदर्श असल्याचे पंड्याने सांगितले. अनेक मोठ्या गोष्टींची सुरूवात स्वप्न पाहण्यापासूनच होते. भारतीय संघात स्थान मिळवणे माझे स्वप्न होते आणि ते पूर्ण झाले आहे. मला आता जॅक कॅलिसप्रमाणे बनायचे आहे. त्याने स्वत:च्या गोलंदाजी आणि फलंदाजीने आफ्रिकेसाठी जे करून दाखवले आहे अगदी तशीच कामगिरी मला भारतीय संघासाठी करायची असल्याचे, पांड्याने म्हटले. तो कोलकाता येथे आयोजित करण्यात आलेल्या भारतीय संघाच्या पत्रकारपरिषदेत बोलत होता.  हार्दिक पांड्यावर धोनीकडून अद्याप विशिष्ट जबाबदारी सोपविण्यात आली नसली तरी त्याच्यामुळे संघ समतोल झाल्याचे धोनीने मध्यंतरी म्हटले होते.