ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेकडून भारताला पराभव स्वीकारावा लागल्याने नाराज क्रिकेटरसिकांनी आपला राग दगडफेकीतून व्यक्त केला.
अंतिम सामन्यात भारताकडून निराशाजनक कामगिरी करणाऱया युवराज सिंगच्या चंदीगडमधील घरावर क्रिकेटरसिकांनी दगडफेक केली. या सामन्यात युवराजने २१ चेंडूत फक्त ११ धावा केल्या तसेच त्याची फलंदाजी अडखळताना दिसली त्यामुळे भारतीय संघाच्या पराभवाला क्रिकेटरसिकांनी युवराजला जबाबदार धरले. सामना संपल्यानंतर रात्री उशीरापर्यंत युवराजच्या घराबाहेर निदर्शने सुरू होती. त्यानंतर दगडफेकीचाही प्रकार घडला.
युवराजच्या खेळीचा बचाव करत वडील योगराज सिंग यांनी युवीच्या २१ चेंडूतील ११ धावा हे भारताच्या पराभवाचे एकमेव कारण ठरू शकत नाही असे स्पष्टीकरण निदर्शनकर्त्यांना दिले. तसेच भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही, “युवराजसाठी अंतिम सामन्याचा दिवस चांगला नव्हता. त्याने चांगली खेळी होण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न केले परंतु, मैदानात उतरताच चौकार-षटकार खेचणे सोपे नसते.” असे म्हणत युवराजचा बचाव केला