28 May 2016

धोनीने सहाव्या स्थानावर खेळणे संघासाठी चांगले -द्रविड

इंग्लंडविरुद्धची मालिका गमावल्यावर भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यावर चहूबाजूंनी टीका होत होती, पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या

पीटीआय, नवी दिल्ली | February 28, 2013 1:32 AM

इंग्लंडविरुद्धची मालिका गमावल्यावर भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यावर चहूबाजूंनी टीका होत होती, पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात द्विशतक झळकावल्यावर मात्र त्याच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षांव होत आहे. भारताचा माजी कर्णधार आणि ‘द वॉल’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या राहुल द्रविडने ‘धोनीने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला यावे, ते संघासाठी हितावह ठरेल,’ असे मत व्यक्त केले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या नागपूर कसोटी धोनी सहाव्या क्रमांकावर खेळला तो तब्बल दोन वर्षांनी. यापूर्वी २०१० साली दक्षिण  आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात धोनी सहाव्या स्थानावर खेळला होता. हाच क्रमांक मग ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने कायम राखला. धोनीने ११६ कसोटी सामन्यांमध्ये जास्तीत जास्त वेळा सातव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे, तर सहाव्या क्रमांकावर तो फक्त १७ वेळा फलंदाजीला आला आहे.
‘‘धोनी वरच्या क्रमांकावर खेळायला आल्यामुळे त्याला ही खेळी खेळण्याची संधी मिळाली. सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणे सोपे नसते. सहाव्या क्रमांकावर खेळताना त्याला मुख्य फलंदाजांची साथ मिळतेच आणि त्यानंतर येणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंबरोबरही त्याला धावा वाढवत्या येऊ शकतात,’’ असे द्रविड म्हणाला.
तो पुढे म्हणाला की, ‘‘भारतीय संघाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास धोनीने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला यायला हवे. तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यावर संघात चांगला समतोल राखला जाऊ शकतो. माझ्या मते सामना मायदेशात असेल किंवा परदेशात धोनीने यापुढे सहाव्या क्रमांकावरच फलंदाजीला यायला हवे.’’
धोनीच्या द्विशतकाबद्दल द्रविड म्हणाला की, ‘‘ही त्याच्यासाठी फार महत्त्वाची खेळी होती. पराभवाबरोबरच धोनीची फलंदाजीही चांगली होत नव्हती. या खेळीने त्याच्याबरोबरच संघाचा आत्मविश्वासही दुणावला असेल. पण त्याच्याकडून प्रत्येक वेळी अशा खेळीची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल.’’

First Published on February 28, 2013 1:32 am

Web Title: if dhoni play at sixth position is good for team dravid