टीम इंडियाचा डावखुरा फलंदाज युवराज सिंग क्रिकेट विश्वात आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. युवराज सिंग पूर्ण फॉर्ममध्ये असला की, गोलंदाजांना केवळ चेंडू सीमापार जात असताना पाहावे लागते. कारण युवराज सिंगच्या बॅटचा तडाखा इतका जबरदस्त असतो की जगातील सर्वोत्तम गोलंदाजदेखील त्याच्यापुढे हतबल होतात. मात्र वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात युवराज सिंगसोबत असा एक प्रसंग घडला आहे, की ज्यामुळे सगळ्यांनाच हसू येते आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या बाद झाल्यावर युवराज सिंग फलंदाजीसाठी मैदानात आला. यावेळी युवराज सिंगने घातलेली जर्सी पाहून अनेकांना हसू आवरता आले नाही. कारण युवराज सिंग चक्क नुकत्याच संपलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेची जर्सी घालून मैदानात उतरला होता. संघ व्यवस्थापन नव्या दौऱ्यावर जाताना खेळाडूंना नवी जर्सी देते. त्यामुळे खेळाडू नव्या दौऱ्यावर नवी जर्सी परिधान करुन मैदानावर उतरतात. मात्र युवराज सिंगच्या जर्सीवर चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचा लोगो दिसत होता. त्यामुळे युवराज चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी देण्यात आलेली जर्सी परिधान करुन मैदानात उतरल्याचे अनेकांच्या लक्षात आले. यामुळे अनेकांना हसू आवरणे अवघड जात होते.

युवराज सिंग चॅम्पियन्स करंडक स्पर्धेची जर्सी घालून मैदानात का उतरला, यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. भारतीय संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला, त्यावेळी युवराजने त्याची चूक सुधारली होती. क्षेत्ररक्षणावेळी युवराज सिंग नव्या जर्सीमध्ये मैदानात दिसला. युवराज सिंगला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत आतापर्यंत चांगली कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या सामन्यात युवराज ४ धावांवर बाद झाला, तर दुसऱ्या सामन्यात युवराजला अवघ्या १४ धावा काढून तंबूत परतला.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात अजिंक्य रहाणे (१०३), कर्णधार विराट कोहली (८७) आणि शिखर धवन (६३) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने ४३ षटकांमध्ये ३१० धावांचा डोंहर उभा केला. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला ४३ षटकांमध्ये ६ बाद २०५ धावाच करता आल्या. त्यामुळे वेस्ट इंडिजला १०५ धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताकडून कुलदीप यादवने ३, भुवनेश्वर कुमारने २, तर अश्विनने एका फलंदाजाला माघारी धाडले.