मालिकेत सलग दोन सामने जिंकून विजय पथावर परतलेल्या इंग्लंडच्या संघाला आता नागपूरही जिंकायचे आहे, असे मत इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक याने सामन्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
इडन गार्डन्सवर विजय मिळवून इंग्लंडने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली असून नागपूर येथील चौथा सामना अनिर्णित राखला तरी मालिका विजयाची माळ त्यांच्या गळ्यात पडेल.
सामना अनिर्णित राखायचा, या मानसिकतेने आम्ही पुढच्या कसोटीमध्ये उतरणार नाही, विजय मिळवण्याच्याच ध्येयाने आम्ही नागपूर कसोटी खेळू. गेल्या दोन सामन्यांमध्ये जे केलं तेच आम्हाला पुढच्या सामन्यातही करायचे आहे, असे कुक म्हणाला.
यावेळी कुकने विजयाचे श्रेय प्रशिक्षक अ‍ॅन्डी फ्लॉवर आणि गोलंदाजी प्रशिक्षक मुश्ताक अहमद यांना दिले आहे. मुश्ताकसारखा प्रशिक्षक भेटला, यासाठी आम्ही स्वत:ला नशीबवान समजतो. त्याला इथल्या खेळपट्टय़ांची चांगलीच माहिती असून त्याच्या अनुभवाचा आम्हाला भरपूर फायदा झाला. अ‍ॅन्डी एक चांगला फलंदाज होता. त्यामुळे या दोघांचाही आम्हाला चांगलाच फायदा झाला, असे कुक म्हणाला.