केरळ ब्लास्टर्सवर २-१ अशी मात
‘फुटबॉलचे अनभिषिक्त सम्राट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेले यांच्या उपस्थितीत अ‍ॅटेलटिको कोलकाता संघाने इंडियन सुपर लीग फुटबॉलमध्ये केरळ ब्लास्टर्सवर २-१ अशी मात केली.

सॉल्ट लेक स्टेडियमवर सुमारे ६१ हजार प्रेक्षकांच्या चाहत्यांना फुटबॉलचा अनोखा आनंद लुटण्याची संधी मिळाली. गतवर्षी याच दोन संघांमध्ये या स्पर्धेच्या विजेतेपदाची लढत झाली होती. त्यामध्ये कोलकाता संघाला विजय मिळाला होता. मंगळवारी त्याचीच पुनरावृत्ती करताना कोलकाता संघास संघर्ष करावा लागला. अराटा इझुमी व झेवियर लारा यांनी कोलकाता संघाकडून प्रत्येकी एक गोल केला. मात्र त्यांना गोल नोंदविण्यासाठी पास देणारा इयान ह्य़ुम हाच सामन्याचा शिल्पकार ठरला. केरळ संघाचा एकमेव गोल ख्रिस डॅग्नेलने केला.
चुरशीने झालेल्या या लढतीत दोन्ही संघांनी जोरदार खेळ केला. केरळने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र सामन्याचा पहिला गोल कोलकाताकडून अराटाने सामन्याच्या सहाव्या मिनिटाला नोंदवला. त्यानंतर केरळने गोल करण्याची संधी दोन वेळा वाया घालवली. पूर्वार्धात कोलकाता संघाने १-० अशी आघाडी राखली होती.

उत्तरार्धात कोलकाता संघाने पुन्हा जोरदार चाली केल्या. आठव्याच मिनिटाला इयान ह्य़ुमने मारलेला चेंडू गोलपोस्टला आदळून परतला. त्यावर शिताफीने चाल करीत झेव्हियरने गोल केला. त्यानंतर बराच वेळ त्यांच्याकडे २-० अशी आघाडी होती. सामना संपण्यास दहा मिनिटे बाकी असताना केरळ संघाला गोल करण्याची सुवर्णसंधी मिळाली. त्याचा फायदा घेत डॅग्नेलने सुरेख फटका मारून गोल केला. पण त्यानंतरही त्यांना कोलकात्याच्या बचावफळीतील ढिलाईपणाचा फायदा उचलता आला नाही.

पेलेंच्या उपस्थितीमुळे उत्साहाला उधाण

पेले आणि फुटबॉल हे कधीही न तुटणारे समीकरण आहे. या फुटबॉलसम्राटाला पाहण्यासाठी सॉल्ट लेक स्टेडियमवर जनसागर लोटला होता. पेले हे अनेक वेळा दहा क्रमांकाची जर्सी घालून खेळत असत. अनेक प्रेक्षकांनी दहा क्रमांकाची जर्सी परिधान केली होती. पेले यांच्या स्वागताचे आणि जयघोषाचे फलक उंचावत त्यांनी या सम्राटाला मानाचा मुजराच केला.
१९७७ मध्ये मोहन बागानविरुद्ध झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात न्यूयॉर्क कॉसमॉस क्लबचे प्रतिनिधित्व पेले यांनी केले होते. हा सामना २-२ असा बरोबरीत राहिला होता. त्यानंतर २८ वर्षांनी प्रथमच पेले हे भारत-भेटीस आले आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्कंठा होती आणि याचा प्रत्यय यावेळी स्टेडियममध्ये पाहायला मिळाला.