गुरकिराट सिंगच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारतीय ‘अ’ संघाला तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेत विजेतेपदाला गवसणी घालता आली. अंतिम सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा चार विकेट्स राखून पराभव केला.
भारताच्या फिरकी गोलंदाजांनी प्रभावी मारा करून ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. २२७ धावसंख्येचे आव्हान पेलताना भारताच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. मग गुरकिराटने नाबाद ८७ धावांची दिमाखदार खेळी साकारून भारताच्या विजयाचा अध्याय लिहिला.
या स्पध्रेत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत एकही सामना जिंकता आला नव्हता. मात्र अंतिम सामन्यात भारताने अप्रतिम सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. बिनबाद ५९ अशा सुस्थितीनंतर ३ बाद ६५ अशी भारताची केविलवाणी अवस्था झाली. त्यानंतर भारताचा निम्मा संघ १०८ धावांत तंबूत परतला. त्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा मंदावल्या. परंतु ४१ धावांत २ बळी घेणाऱ्या गुरकिराटने झुंजार फलंदाजी केली. ८५ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांच्या बळावर त्याने आपली खेळी उभारली. लाँग ऑनला सुरेख षटकार खेचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गुरकिराटला संजू सॅमसनने (४२ चेंडूंत २४ धावा) छान साथ दिली. त्यामुळे उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला कांगारूंविरुद्ध स्पध्रेत प्रथमच विजय मिळवता आला. ऑस्ट्रेलियाकडून डावखुरा फिरकी गोलंदाज अ‍ॅश्टॉन अगरने ३९ धावांत २ बळी घेतले.
त्याआधी, नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. मग उस्मान ख्वाजा (७६) आणि जो बर्न्‍स (४१) यांनी ८२ धावांची सलामी नोंदवली.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया ‘अ’ : ५० षटकांत ९ बाद २२६ (उस्मान ख्वाजा ७६, जो बर्न्‍स ४१; करण शर्मा ३/३७, अक्षर पटेल २/२५, गुरकिराट सिंग २/४२) पराभूत वि. भारत ‘अ’ : ४३.३ षटकांत ६ बाद २२९ (गुरकिराट सिंग नाबाद ८७, मयांक अगरवाल ३२; अ‍ॅश्टॉन अगर २/३९)
सामनावीर : गुरकिराट सिंग.
मालिकावीर : मयांक अगरवाल.