भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या उदयोन्मुख खेळाडूंना  निवड समितीचे लक्ष वेधण्याची संधी श्रीलंकेविरुद्ध गुरुवारी होणाऱ्या एकदिवसीय सराव सामन्यात मिळणार आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणाऱ्या या सराव सामन्यात मनोज तिवारीच्या नेतृत्वाखालील भारत ‘अ’ संघ श्रीलंकेशी सामना करणार आहे.
बोटाला आणि खांद्याला झालेल्या दुखापतीतून सावरलेल्या रोहित शर्माला आपली तंदुरुस्ती आणि खेळ दाखवायची संधी या सामन्यात मिळेल. श्रीलंकेविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर झाला असून, अखेरच्या दोन सामन्यांमध्ये पुनरागमन करण्यासाठी तो उत्सुक आहे.
मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधव सलामीच्या स्थानावर फलंदाजीला उतरू शकेल. जेणेकरून पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकासाठी पर्यायी सलामीवीर म्हणून त्याच्या नावाचा विचार करता  येऊ शकेल.