भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित बॉर्डर – गावस्कर चषकाचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना पुण्यात रंगणार असून २३ – २७ फेब्रुवारी दरम्यान हा सामना होणार आहे.

ऑस्ट्रेलिया संघ चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी फेब्रुवारीमध्ये भारत दौ-यावर येणार आहे. बीसीसीआयने शुक्रवारी या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर या मालिकेतील पहिला कसोटी सामना रंगणार असून यामुळे पुण्यातील क्रिकेटप्रेमींसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना ४ मार्चरोजी बेंगळुरुत होणार आहे. या सामन्यानंतर दोन्ही संघांना एक आठवड्यासाठी विश्रांती दिली जाईल. तिसरा कसोटी सामना १६ मार्चरोजी रांची येथे होणार असून चौथा आणि अंतिम कसोटी सामना २४ मार्च रोजी धरमशाला येथे होणार आहे.

बॉर्डर – गावस्कर चषकात २००१३ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर ४-० असा दिमाखदार विजय मिळवला होता. तर २०१४- १५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या या मालिकेत भारताला २-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेनंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने तडकाफडकी कसोटी सामन्यांमधून निवृत्ती स्वीकारली होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारताला इंग्लंडसोबतही कसोटी मालिका खेळायची आहे. इंग्लंड संघ डिसेंबर आणि नोव्हेंबरमध्ये भारत दौ-यावर येणार असून या कालावधीत कसोटी सामने खेळले जातील. यानंतर ख्रिसमसनिमित्त इंग्लंडचा संघ मायदेशी परतेल. जानेवारीमध्ये हा संघ पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी पुन्हा भारतात येणार आहेत.  भारतीय संघ सध्या न्यूझीलंडसोबत खेळत असून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने किवींना ३-० ने व्हाईटवॉश दिला होता. तर सध्या सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत दोन्ही संघ १-१ ने बरोबरीवर आहेत.

भारत – ऑस्ट्रेलियात होणा-या बॉर्डर – गावस्कर मालिकेचे वेळापत्रक  

पहिला कसोटी सामना – २३ ते २७ फेब्रुवारी २०१७ – पुणे</p>

दुसरा कसोटी सामना – ४ ते ८ मार्च २०१७ – बेंगळुरु

तिसरा कसोटी सामना – १६ ते २० मार्च – रांची

चौथा कसोटी सामना – २४ ते २८ मार्च – धरमशाला