वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेत विजयी मिळवल्यानंतर मायदेशात कांगारुंचे आव्हान परतवून लावण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. आगामी मालिकेसाठी संघातील सर्वच खेळाडू कसून सराव करताना दिसत आहेत. आगामी मालिकेची तयारी करतानाचे काही क्षण खेळाडू चाहत्यांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताचा कर्णधार विराटने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने हातामध्ये तिरंगा घेतल्याचे दिसते आहे. या व्हिडिओत विराट निळ्या रंगाची जर्सी घालून आगामी सामन्यासाठी सज्ज असल्याचे संकेत देताना दिसते. ‘हा क्षण खूपच आनंददायी आहे. जय हिंद! या कॅप्शनसह त्याने हा व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केलाय. विराट कोहलीचा हा व्हिडिओ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी चित्रित करण्यात आला असून लवकरच हा व्हिडिओ टेलिव्हिजनवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

विराट कोहलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून देशप्रेम व्यक्त करत असताना अजिंक्य रहाणे आगामी सामन्यासाठी नेटमध्ये घाम गाळताना दिसतोय. आगामी मालिकेत लक्षवेधी कामगिरी करण्यासाठी त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून खास टिप्स घेतल्या. नेट प्रॅक्टिसमध्ये येऊन मार्गदर्शन केल्याबद्दल त्याने सचिनचे आभार मानले आहेत. रहाणेने सचिनसोबतचा फोटो ट्विटरवरुन शेअर केलाय. या फोटोतील कॅप्शनमध्ये रहाणेने लिहिलंय की, ‘नेट प्रॅक्टिस खूपच छान होते. वेळ काढून मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप आभारी आहे पाजी’ रहाणेला संघात स्थान मिळाले असले तरी त्याला मैदानात उतरण्याची संधी कितपत मिळणार हे सामन्यावेळीच कळेल. तो नेहमीच भारतीय संघात स्थान मिळवण्यात यशस्वी होतो. पण बऱ्याचदा त्याला अंतिम ११ मध्ये स्थान मिळत नाही. पण, जेव्हा त्याला संधी मिळते तेव्हा त्याने संधीच सोनं केलं आहे. त्यामुळे आगामी सामन्यात त्याला कोहली संधी देणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.