कॅनडावर ४-० ने मात

स्वप्नवत जेतेपदाच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या भारताच्या कनिष्ठ पुरुष हॉकी संघाने गुरुवारपासून सुरु झालेल्या कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पध्रेत विजयी सलामी दिली. लखनौ येथील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर झालेल्या ‘ड’ गटातील लढतीत भारताने ४-० अशा फरकाने कॅनडावर दणदणीत विजय नोंदवला. तत्पूर्वी, धुक्यामुळे स्पर्धा आयोजनात व्यत्यय निर्माण झाला होता आणि जागतिक हॉकी महासंघाला (एफआयएच) सायंकाळच्या सामन्यांच्या वेळेत बदल करावा लागला.

मनदीप सिंग (३५ मि.), हरमनप्रीत सिंग (४६ मि.), वरुण कुमार (६० मि.) आणि अजित पांडे (६६ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करून भारताला तीन गुणांची कमाई करून दिली. २००१ सालानंतर कनिष्ठ गटातील विश्वचषक पटकावण्याचे प्रचंड दडपण घेऊन मैदानावर उतरलेल्या भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय खेळ केला. सुरुवातीला काहीसे लडखडणाऱ्या भारतीय खेळाडूंनी लगेचच सांघिक खेळाची मोट बांधली. कॅनडाच्या बचावफळीला भेदून भारताने धारधार आक्रमणाचे सत्र सुरू ठेवले.  भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु हरमनप्रीतचे हे प्रयत्न कॅनडाचा गोलरक्षक इक्वींदर गिलने अडवले. दुखापतीतून सावरणाऱ्या मनदीपने भारताला ३५व्या मिनिटाला आघाडी मिळवून दिली. त्यापाठोपाठ हरमनप्रीत, वरुण व अजित यांनी गोल करत भारताच्या विजयावर ४-० असे शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, झालेल्या ‘ड’ गटाच्या लढतीत इंग्लंडने ४-२ अशा फरकाने दक्षिण आफ्रिकेवर, ‘क’ गटात जर्मनीने स्पेनवर २-१ असा, तर न्यूझीलंडने जपानवर १-० असा विजय मिळवला.