सुनील छेत्री शिल्पकार

अखेरच्या मिनिटाला सुनील छेत्रीने नोंदवलेल्या गोलमुळे इतिहास घडला. या एकमेव गोलमुळे भारताने तब्बल ६४ वर्षांनंतर म्यानमारविरुद्ध सामना जिंकण्याचा पराक्रम केला. त्यामुळे एएफसी आशियाई चषक पात्रता स्पध्रेत भारताने झोकात आपल्या अभियानाला प्रारंभ केला आहे.

रंगून येथे (आताचे यांगोन) ऑक्टोबर १९५३मध्ये झालेल्या चौरंगी फुटबॉला स्पध्रेत भारताने म्यानमारला ४-२ अशा फरकाने हरवले होते. अगदी ताजे उदाहरण द्यायचे झाल्यास यांगोन येथे मार्च २०१३ मध्ये झालेल्या एएफसी चॅलेंज चषक पात्रता स्पध्रेत म्यानमारने भारताला १-० असे हरवले होते.

म्यानमारचा संघ भारतापेक्षा बलवान मानला जातो. या सामन्यातसुद्धा अखेपर्यंत म्यानमार संघाचे मध्यरक्षण भेदणे भारतासाठी आव्हानात्मक ठरत होते. अखेरीस ९०व्या मिनिटाला उदंता सिंगच्या साहाय्यामुळे छेत्रीला विजयी गोल साकारता आला.

[jwplayer gLyhqAeU-1o30kmL6]

या सामन्याआधी म्यानमारचा संघ भारताच्या तुलनेत मजबूत आहे, असे भारताचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टनटाइन यांनी म्हटले होते. म्यानमारने दुसऱ्या सत्रात आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. मात्र त्यांना या दिमाखदार खेळाद्वारे गोल झळकावण्यात अपयश आले. थुवुन्ना स्टेडियमवर झालेला हा सामना गोलशून्य बरोबरीत सुटण्याची लक्षणे दिसत असताना छेत्रीने अनपेक्षितपणे गोल साकारून सर्वानाच थक्क केले.

भारतीय संघ घरच्या मैदानावर १३ जूनला किरगिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे. भारताचा समावेश असलेल्या ‘अ’ गटात मकाऊ हा चौथा संघ आहे. गटातील अव्वल दोन संघ २०१९मध्ये संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या एएफसी आशियाई चषक स्पध्रेसाठी पात्र ठरतील.

[jwplayer pqdTtL1f-1o30kmL6]