भारत दौऱयावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेसंघाविरुद्धच्या भारताच्या पराभवाची मालिका अखेर बुधवारी संपुष्टात आली. भारतीय संघाने इंदुर येथील सामन्यात द.आफ्रिकेवर २२ धावांनी विजय प्राप्त करून पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत द.आफ्रिकेसोबत १-१ अशी बरोबरी साधली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात अपेक्षित विजय मिळवून देऊ न शकल्याने टीकाकारांचे केंद्रस्थान झालेल्या धोनीने इंदुरमधील सामन्यात अप्रतिम खेळाचा नजराणा पेश करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. तर, अक्षर पटेल आणि भुवनेश्वर कुमार यांनीही आफ्रिकन फलंदाजांना लगाम घालून आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवली. कोहलीने टिपलेले दोन झेल महत्त्वपूर्ण ठरले तर रहाणे देखील भारताच्या विजयाचा मोलाचा वाटेकरी ठरला.

भारताच्या विजयाचे पंचक-
* संघ बिकट स्थितीत असताना धोनीने मैदानात जम बसवून नाबाद ९२ धावांची कर्णधारी खेळी साकारली.

* सलामी जोडी स्वस्तात माघारी परतल्यानंतर अजिंक्य रहाणेने चिवट खेळ करून अर्धशतकाचे योगदान दिले.

* भारताच्या गोलंदाजांना यावेळी द.आफ्रिकेच्या फलंदाजांवर दबाव निर्माण करण्यात यश आले. फिरकीपटू अक्षर पटेल, हरभजन सिंग आणि भुवनेश्वर कुमार या त्रिसुत्रीने आफ्रिकेच्या फलंदाजांना जखडून ठेवले. अक्षर आणि भुवनेश्वरने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.

* कोहलीने सामन्यात तीन झेल टीपले यातील दोन झेल अप्रतिम ठरले. ‘कॅचेस विन मॅचेस’ प्रत्यय या सामन्यात आला. विस्फोटक फलंदाज ए.बी.डीव्हिलियर्स आणि फॅफ डू प्लेसिस या दोन महत्त्वाच्या फलंदाजांचे कोहलीने अप्रतिम झेल टीपले. डीव्हिलियर्स बाद झाल्यानंतर भारताचा विजय निश्चित झाला. त्यानंतर द.आफ्रिकेचा संघ कोसळला. सुरेश रैनाने मोर्ने मॉर्केलचा स्लिपला झेल टीपला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

* संघाच्या वरच्या पट्टीतील फलंदाज स्वस्तात माघारी परतले असताना हरभजन सिंगने धोनीला साजेशी साथ देऊन २२ धावा केल्या. तर, द.आफ्रकेच्या दोन महत्त्वाच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढून भारताला यश मिळवून दिले.