के.एल. राहुल याच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने हरारे येथील झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. के.एल. राहुलने पदार्पणातच शतक झळकावण्याचा विक्रम केला, तर अंबाती रायडूने नाबाद ५० धावांची खेळी करत त्याला सुयोग्य साथ दिली. झिम्बाब्वेने दिलेल्या १६९ या माफक धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची सलामीवीर करूण नायर अवघ्या ७ धावा करून तंबुत परतला. मात्र, त्यानंतर के.एल. राहुल आणि रायडू यांनी भारतीय डावाची पडझड होऊन न देता संघाला विजय मिळवून दिला. झिम्बाब्वेच्यादृष्टीने समाधानाची बाब इतकीच की, अननुभवी गोलंदाजी असूनही भारतीय फलंदाजांना १६९ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी ४३ षटके झगडावे लागले. या विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
तत्पूर्वी बुमराह आणि अन्य भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर झिम्बाब्वेचा डाव १६८ धावांमध्ये संपुष्टात आला. बुमराहने चार गडी बाद केले. संघातील प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीत धवल कुलकर्णी, बरिंदर स्रान आणि युझवेंद्र चहल यांनी मिळालेल्या संधीचा योग्य फायदा उठवत झिम्बाब्वेच्या अननुभवी फलंदाजांवर वर्चस्व राखले. धवल कुलकर्णीने ४२ धावांत दोन, स्रानने ४२ धावांत दोन गडी बाद केले, तर बुमराहने २८ धावांत चार बळी मिळविले.