* ९२ धावांची निर्णायक नाबाद खेळी * अक्षर पटेल आणि भुवनेश्वर कुमारचे ३ बळी * मालिका १-१ बरोबरीत
महेंद्रसिंग धोनीने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर आपल्या कर्णधाराला साजेशा खेळीने आणि शानदार विजयाने दिले. धोनीच्या ९२ धावांच्या नाबाद खेळीच्या बळावर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर २२ धावांनी मात केली. भारताने ९ बाद २४७ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. परंतु दक्षिण आफ्रिकेला ४३.३ षटकांत २२५ धावांत गुंडाळूनीाारताने दक्षिण आफ्रिकेचा अश्वमेध रोखला. भुवनेश्वर कुमार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.धोनीने पूल, कट्स, गोलंदाजांच्या डोक्यांवरून उंच फटके, वेगवान एकेरी, आदी आपल्या भात्यातील समर्थ फटकेबाजीने क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. ८६ चेंडूंत ७ चौकार आणि ४ षटकारांसह धोनीने आपली ही खेळी साकारली.‘कॅप्टन कूल’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या धोनीने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत भारताच्या धावफलकावर समाधानकारक धावसंख्या झळकावली. अखेरच्या १० षटकांत भारताने ८२ धावा काढल्या.

४० व्या षटकाअखेरीस भारताची ७ बाद १६५ अशी अवस्था झाली होती. त्या वेळी दोनशे धावांचा टप्पासुद्धा भारतासाठी अशक्यप्राय दिसत होता. धोनीने हरभजन सिंग (२२) सोबत आठव्या विकेटसाठी ५६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने जिगरबाज दीडशतकी खेळी उभारली होती. मात्र युवा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाने दुसऱ्या षटकात त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. मग शिखर धवन (२३) आणि अजिंक्य रहाणे यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. रहाणेने डेल स्टेनच्या गोलंदाजीवर हल्ला चढवत तीन चौकार ठोकले. तिसऱ्या क्रमांकाला न्याय देत रहाणेने सलग दुसरे अर्धशतक झळकावले. त्याने ६३ चेंडूंत ५१ धावा केल्या.

मॉर्नी मॉर्केलच्या १८ व्या षटकात रहाणेचा झेल फरहान बेहरादिनने मिड-ऑफला सोडला. त्यानंतर रहाणेने एकेरी धाव घेतली, परंतु कोहलीला दुहेरी धावा हव्या असल्याने तो दुसऱ्या धावेसाठी धावला. मात्र रहाणे जागीच उभा राहिल्याने कोहली धावचीत झाला. निराश कोहलीला त्यानंतर आपला क्रोध आवरणे कठीण गेले. मग धोनीने संयमी फलंदाजी करीत डावाला आकार दिला.
वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केल्यावर रहाणेचा अडसर लेग स्पिनर इम्रान ताहीरने काढला. सुरेश रैना भोपळा फोडण्यातही अपयशी ठरला. त्यामुळे २३.४ षटकांत भारताची ५ बाद १०५ अशी अवस्था झाली. मग धोनीने अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हरजन आणि मोहित शर्मा यांना सोबतीला घेत जिद्दीने किल्ला लढवला.

दक्षिण आफ्रिकेकडून स्टेन (३/४९) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मॉर्केल आणि ताहीर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
त्यानंतर, आफ्रिकेकडून हशिम अमला आणि क्विंटन डी कॉक यांनी ४० धावांची सलामी दिली. मोठी खेळी उभारण्यात दोघेही अपयशी ठरल्यानंतर फॅफ डू प्लेसिस आणि जीन-पॉल डय़ुमिनी यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी रचली. डय़ुमिनी (३६) आणि प्लेसिस (५१) या दोघांना अक्षर पटेलने तंबूची वाट दाखवून सामना भारताच्या दिशेने झुकवला. ए बी डी’व्हिलियर्सचा (१९) अडसर मोहित शर्माने दूर केला. विराट कोहलीने त्याचा सुरेख झेल टिपला.

धावफलक
भारत : रोहित शर्मा त्रि. गो. रबाडा ३, शिखर धवन झे. डय़ुमिनी गो. मॉर्केल २३, अजिंक्य रहाणे त्रि. गो. ताहीर ५१, विराट कोहली धावचीत १२, महेंद्रसिंग धोनी नाबाद ९२, सुरेश रैना झे. डी कॉक गो. मॉर्केल ०, अक्षर पटेल पायचीत गो. स्टेन १३, भुवनेश्वर कुमार त्रि. गो. ताहीर १४, हरभजन सिंग झे. डी कॉक गो. स्टेन २२, उमेश यादव झे. डी कॉक गो. स्टेन ४, मोहित शर्मा नाबाद ०, अवांतर (लेगबाइज २, वाइड १०, नोबॉल १) १३, एकूण ५० षटकांत ९ बाद २४७
बाद क्रम : १-३, २-५९, ३-८२, ४-१०२, ५-१०४, ६-१२४, ७-१६५, ८-२२१, ९-२२५
गोलंदाजी : डेल स्टेन १०-०-५९-३, कॅगिसो रबाडा १०-१-४९-१, मॉर्नी मॉर्केल १०-०-४२-२, जीन-पॉल डय़ुमिनी ९-०-५९-०, इम्रान ताहीर १०-१-४२-२, फरहान बेहरादिन १-०-४-०.
दक्षिण आफ्रिका : हशिम अमला यष्टीचीत धोनी गो. पटेल १७, क्विंटन डी कॉक झे. मोहित शर्मा गो. हरभजन ३४, फॅफ डू प्लेसिस झे. कोहली गो. पटेल ५१, जीन-पॉल डय़ुमिनी पायचीत गो. पटेल ३६, ए बी डी’व्हिलियर्स झे. कोहली गो. मोहित शर्मा १९, डेव्हिड मिलर झे. धोनी गो. कुमार ०, फरहान बेहरादिन झे. धोनी गो. हरभजन १८, डेल स्टेन झे. कोहली गो. यादव १३, कॅसिगो रबाडा नाबाद १९, इम्रान ताहीर झे. धोनी गो. कुमर ९, मॉर्नी मॉर्केल झे. रैना गो. कुमार ४, अवांतर (लेगबाइज ३, वाइड २) ५, एकूण ४३.३ षटकांत सर्व बाद २२५
बाद क्रम : १-४०, २-५२, ३-१३४, ४-१४१, ५-१४२, ६-१६७, ७-१८६, ८-२००, ९-२२१, १०-२२५
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ८.४-०-४१-३, उमेश यादव ८-०-५२-१, हरभजन सिंग १०-०-५१-२, अक्षर पटेल १०-०-३९-३, मोहित शर्मा ५-०-२१-१, सुरेश रैना २-०-१८-०