भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ब्रिस्बेन कसोटीच्या चौथ्या दिवशीच भारतीय संघावर पराभवाची नामुष्की ओढवली. कालच्या १ बाद ७१ या धावसंख्येवरून चौथ्या दिवशी डावाची सुरूवात करणारा उर्वरित भारतीय संघ अवघ्या १५३ धावांमध्ये माघारी परतला. त्यानंतर संघाचा पराभव टाळण्यासाठी भारतीय गोलंदाजांनी केलेले शर्थीचे प्रयत्न अपुरे पडले. ऑस्ट्रेलियाने भारताचे हे माफक लक्ष्य सहा गड्यांच्या मोबदल्यात पार केले. शिखर धवन आणि चेतेश्वर पुजाराचा अपवाद वगळता अन्य भारतीय फलंदाज यजमानांच्या माऱ्यासमोर हतबल ठरले. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून सलामवीर ख्रिस रॉजर्सने सर्वाधिक ५५ धावा केल्या. चौथ्या दिवशी दोन्ही संघांचे मिळून १५ गडी बाद झाले. 
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाच्या शेपटाने शुक्रवारी भारतीय गोलंदाजांना आपला जबरदस्त तडाखा दिला. त्यामुळे यजमानांना पाचशेचा टप्पा आरामात गाठता आला. कर्णधारपदाच्या जबाबदारीला स्टिव्हन स्मिथने शानदार शतकानिशी दिमाखात प्रारंभ केला, तर मिचेल जॉन्सन आणि मिचेल स्टार्क यांनी अर्धशतके झळकावत त्याला सुरेख साथ दिली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ९७ धावांची आघाडी घेतल्यानंतर उत्तरार्धात भारताने १ बाद ७१ अशी मजल मारली.