कसोटी मालिकेत मानहानीकारक पराभव पत्करल्यानंतर खचलेल्या विश्वविजेत्या भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत मात्र जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानाला साजेशा खेळाचे प्रदर्शन केले. त्यामुळे तब्बल दोन तपांनंतर (२४ वर्षांनी) इंग्लिश भूमीवर भारताने एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम दाखवला. दीड महिन्यांपूर्वी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत लॉर्ड्सवर शतक झळकावून भारताच्या ऐतिहासिक विजयाचा पाया रचणाऱ्या मुंबईकर अजिंक्य रहाणेनेच पहिलेवहिले एकदिवसीय शतक झळकावण्याची किमया साधून या विजयाचा अध्याय लिहिला. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नऊ विकेट राखून इंग्लंडला सहजगत्या हरवले.
भारताने १९९०मध्ये इंग्लिश भूमीवर एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम दाखवला होता. त्या वेळी दोन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील लीड्सवरील पहिला सामना भारताने सहा विकेट्सने तर नॉटिंगहॅमचा सामना पाच विकेट राखून जिंकला होता.
इंग्लंडविरुद्धच्या या विजयानिशी महेंद्रसिंग धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. हा त्याच्या खात्यावरील ९१वा विजय ठरला. मोहम्मद अझरुद्दीनचा ९० एकदिवसीय विजयांचा विक्रम मागे त्याने टाकला.
भारताने नाणेफेक जिंकल्यावर इंग्लंडला फलंदाजीला पाचारण केले आणि ४९.३ षटकांत २०६ धावांत त्यांचा डाव गुंडाळला. मग हे आव्हान ३०.३ षटकांत आरामात पार करून सलग तिसरा एकदिवसीय सामना जिंकला. रहाणेने इंग्लंडच्या वेगवान माऱ्यावर जोरदार हल्ला चढवत १०० चेंडूंत १० चौकार आणि ४ षटकारांच्या साहाय्याने १०६ धावांची खेळी साकारली. त्याला तोलामोलाची साथ लाभली ती सूर गवसलेल्या शिखर धवनची. धवनने ११ चौकार आणि ४ षटकारांनिशी नाबाद ९७ धावा केल्या. या जोडीने २८.४ षटकांत १८३ धावांची सलामी नोंदवत भारताच्या विजयाची पायाभरणी केली.
तत्पूर्वी, भारताच्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर इंग्लंडचा डाव फक्त २०६ धावांत सीमित राहिला. माइन अलीने सर्वाधिक ६७ धावांची झुंजार खेळी साकारली. अलीने ४ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ५० चेंडूंत आपली खेळी उभारली. तथापि, भारताकडून मोहम्मद शमी (२८ धावांत ३ बळी) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याला भुवनेश्वर कुमार (२/१४), रवींद्र जडेजा (२/४०) यांची चांगली साथ लाभली.  अ‍ॅलिस्टर कुक (९) आणि अ‍ॅलेक्स हेल्स (६) झटपट तंबूत परतले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरी जो रूटनेही निराशा केली. त्यामुळे इंग्लंडची ३ बाद २३ अशी वाईट अवस्था झाली होती. परंतु जो रूट (४४) आणि ईऑन मॉर्गन (३२) यांनी चौथ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला.
धावफलक
इंग्लंड : अ‍ॅलिस्टर कुक झे. रैना गो. कुमार ९, अ‍ॅलेक्स हेल्स त्रिफळा गो. कुमार ६, गॅरी बॅलन्स झे. रहाणे गो. शमी ७, जो रूट झे. कुलकर्णी गो. रैना ४४, ईऑन मॉर्गन झे. रैना गो. जडेजा ३२, जोस बटलर पायचीत गो. शमी ११, मोइन अली त्रिफळा गो. अश्विन ६७, ख्रिस वोक्स धावचीत १०, स्टीव्हन फिन त्रिफळा गो. जडेजा २, जेम्स अँडरसन नाबाद १, हॅरी गुर्नी त्रिफळा गो. शमी ३, अवांतर : (लेगबाइज ५, वाइड ९) १४, एकूण : ४९.३ षटकांत सर्वबाद २०६.
बाद क्रम : १-१५, २-१६, ३-२३, ४-१०३, ५-११४, ६-१४६, ७-१९४, ८-२०१, ९-२०२
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ८-३-१४-२, धवल कुलकर्णी ७-०-३५-०, मोहम्मद शमी ७.३-१-२८-३, आर. अश्विन १०-०-४८-१, रवींद्र जडेजा १०-०-४०-२, सुरेश रैना ७-०-३६-१.
भारत : अजिंक्य रहाणे झे. कुक गो. गुर्नी १०६, शिखर धवन नाबाद ९७, विराट कोहली नाबाद १, अवांतर : (लेगबाइज ५, वाइड २, नोबॉल १) ८, एकूण : ३०.३ षटकांत १ बाद २१२.
बाद क्रम : १-१८३.
गोलंदाजी : जेम्स अँडरसन ६-१-३८-०, हॅरी गुर्नी ६.३-०-५१-१, स्टीव्हन फिन ७-०-३८-०, ख्रिस वोक्स ४-०-४०-०, मोइन अली ७-०-४०-०.