भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम टी-२० लढतीत भारताने ऑस्‍ट्रेलियाचा ७ गडी राखून पराभव केला. तिसरा सामनाही आपल्या खिशात घालत भारताने टी-२० या मालिकेत ३-० असा विजय मिळवला आहे.  या विजयामुळे भारतीय संघाने १४० वर्षांनी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच व्हाईट वॉश देण्याचा पराक्रम केला आहे.
१९८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानावर उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी प्रत्युरात धडाकेबाज सुरूवात केली.  शिखर धवनने अवघ्या ९ चेंडूत २६ धावा केल्या. त्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी अर्धशतक ठोकले. या दोघांनी संयमी खेळी करत ७८ धावांची भागीदारी करून विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवली. त्यानंतर आलेल्या सुरेश रैनानेही धडाकेबाज खेळ करत २५ चेंडूत ४९ धावा करून डावाला पुढे नेले. तर युवराज सिंगनेही १५ धावा जोडून सुरेश रैनाच्या सहकार्याने भारताला विजय मिळवून दिला. भारताने केवळ तीन गडी गमावून २०० धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानात धूळ चारली.
तत्पूर्वी वॉटसनच्या नाबाद १२४ धावांच्या शानदार खेळीमुळे तिस-या टी – २० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी १९८ धावांचे आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली मात्र ख्वाजा (१४), शॉन मार्श (९) आणि मॅक्सवेल (३) पटापट बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाची स्थिती बिकट झाली होती. पण शेन वॉटसनने एका हाती डाव सावरत शतक तर झळकावलेच पण ऑस्ट्रेलियाला १९८ धावांचा टप्पा गाठून दिला. त्यानंतर हेड २६ आणि ल्यान १३ धावांवर बाद झाले.  भारतातर्फे नेहरा, अश्विन, युवराज, भुमरा आणि जडेजाने प्रत्येकी १ बळी टिपला.