रोमहर्षक लढतीत भारताने मलेशियावर ३-२ अशी मात केली आणि जागतिक हॉकी लीगमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली. पूर्वार्धात एक गोलने पिछाडीवर पडलेल्या भारताला जसजितसिंग खुलरने दोन गोल करीत तारले.
उत्कंठापूर्ण झालेल्या या लढतीत पूर्वार्धात मलेशियाकडे २-१ अशी आघाडी होती. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला सतबीर सिंगने भारताचे खाते उघडले. मात्र पेनल्टी कॉर्नरसारख्या हुकमी संधीचा लाभ घेत मलेशियाच्या राझी रहीम व शाहरील साबा यांनी गोल करीत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र उत्तरार्धात भारताने दोन गोल करीत शानदार विजय मिळविला. त्याचे श्रेय जसजितने पेनल्टी कॉर्नरद्वारा केलेल्या दोन गोलना द्यावे लागेल.
सामन्याच्या सुरुवातीला भारतीय खेळाडूंनी धडाकेबाज चालीला प्रारंभ केला. दुसऱ्याच मिनिटाला मलेशियन बचावरक्षकांना काही कळण्यापूर्वीच भारताचा गोल नोंदविला गेला. त्यांच्या आकाशदीप सिंगने दिलेल्या पासवर सतबीर सिंगने सहज गोल केला. मात्र हा गोल होऊनही मलेशियाने धारदार आक्रमण सुरू केले. त्यामध्ये पाचव्या मिनिटाला त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला, तथापि त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही. भारताने मैदानी गोल करण्याच्या दोन-तीन संधी वाया घालवल्या. पहिला डाव संपण्यास काही सेकंद बाकी असताना मलेशियाला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत रहीमने संघाचे खाते उघडले. १७व्या मिनिटाला त्यांना आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला, मात्र ती संधी त्यांनी वाया घालविली. २३व्या मिनिटाला पंचांनी मलेशियास पेनल्टी कॉर्नर बहाल केला. त्याचा फायदा घेत शाहरीलने गोल करीत संघाला आघाडी मिळवून दिली. पुढच्याच मिनिटाला भारतास पेनल्टी कॉर्नर मिळाला. परंतु ही सुवर्णसंधी त्यांनी वाया घालविली.
उत्तरार्धात सामन्यास कलाटणी देण्याच्या उद्देशाने भारतीय खेळाडू उतरले. ४५व्या मिनिटाला त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला. जसजितने सुरेख फ्लिक करीत चेंडू गोलमध्ये तटवला. या गोलमुळे भारताच्या आक्रमणास आणखी धार आली. मलेशियन खेळाडूंनी या चाली रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांनीही जोरदार चाली केल्या. मात्र भारताचा गोलरक्षक पी.आर.श्रीजेशने मलेशियन चाली बोथट केल्या. ५६व्या मिनिटाला भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. या संधीचा पुरेपूर फायदा घेत पुन्हा जसजितने फ्लिक करीत गोल साकारला आणि संघाला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याची शेवटची ३८ सेकंद बाकी असताना मलेशियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्या वेळी भारतीय खेळाडूंवर दडपण आले, मात्र श्रीजेश व त्याच्या सहकाऱ्यांनी मलेशियाला या संधीचा फायदा घेण्यापासून दूर ठेवले.