जलतरणपटूंना सात सुवर्णपदके; तिरंदाज, सायकलपटूंचे निभ्रेळ यश; वेटलिफ्टिंगपटूंचा दबदबा; खो-खोमध्ये दुहेरी जेतेपद
यजमान भारताला दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेत सातत्यपूर्ण कामगिरीचे ‘सुवर्ण’फळ मिळाले. शिलाँग व गुवाहाटी यांच्या संयुक्त यजमानपदाखाली आयोजित या स्पध्रेच्या चौथ्या दिवशीही भारताचा दबदबा दिसला. जलतरणपटूंनी सात सुवर्णपदकाची कमाई केली, तर वेटलिफ्टिंगपटूंनी १२ सुवर्ण आणि एक रौप्यपदकासह स्पध्रेचा निरोप घेतला. तसेच तिरंदाज, सायकलपटू, वुशूपटू यांनीही सुवर्णपदकाची लयलूट कायम राखली. खो-खोमध्ये भारताच्या पुरुष व महिला संघांनी बाजी मारली.
जलतरणपटूंचे सुवर्ण सप्तपदक
भारतीय जलतरणपटूंनी सातत्यपूर्ण कामगिरी करत सातही सुवर्णपदके आपल्या नावावर केली. श्रीलंकेकडून कडवे आव्हान मिळूनही यजमानांनी आपला दबदबा कायम राखला. सौरभ सांगवेकरने ४०० मीटर फ्रीस्टाइल गटात ३ मिनिटे ५८.८४ सेकंदासह नवा स्पर्धा विक्रम नोंदवत सुवर्ण जिंकले. महिलांच्या ४०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात व्ही. मालविकाने ४ मिनिटे ३०.०८ सेकंदासह सुवर्ण जिंकले. साजन प्रकाशने भारतासाठी तिसरे सुवर्णपदक निश्चित केले.
२०० मीटर बटरफ्लाय प्रकारात त्याने २ मिनिटे ०३.०२ सेकंदाचा नवा विक्रम नोंदवला. महिला गटात दामिनी गौडाने २ मिनिटे २१.१२ सेकंदाची वेळ नोंदवून स्पर्धा विक्रम केला. पी. एस. मधूने पुरुषांच्या ५० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात नव्या स्पर्धा विक्रमासह (२६.८६ सेकंद) सुवर्णपदक पटकावले. ४ बाय २०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात पुरुष व महिला संघाने सुवर्णपदकाची कमाई केली. याशिवाय साजन प्रकाश (४०० मीटर फ्रीस्टाइल, पुरुष), शिवानी कटारीया (४०० मीटर फ्रीस्टाइल, महिला), एम. अरविंद (५० मीटर बॅकस्ट्रोक, पुरुष) आणि माना पटेल (५० मीटर बॅकस्ट्रोक, महिला) यांनी रौप्यपदक पटकावले.
वुशूमध्ये तिसरे सुवर्ण
चिराग शर्माने वुशू प्रकारात भारताला तिसरे सुवर्णपदक पटकावून दिले. तंत्रशुद्ध खेळ करीत शर्माने १८.४५० गुणांची कमाई करून बाजी मारली. नेपाळच्या बिशॉ बुधा मगरने रौप्य, तर पाकिस्तानच्या मुहम्मद वालीद अजमलने कांस्य जिंकले.
भारतीय सायकलपटूंचे वर्चस्व
सायकलिंग प्रकाराच्या अंतिम फेरीत भारताने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकून वर्चस्व गाजवले. ८० किमी वैयक्तिक शर्यतीत टी. बिद्यालक्ष्मीने दोन तास ३० मिनिटे व ५५.३५० सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. भारताच्याच लिडीयामोल सन्नी (२:३०:५५.६९) आणि गिथू राज (२:३०:५५.९०) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या १०० किमी वैयक्तिक शर्यतीत पंकज कुमारने रौप्यपदक जिंकले. श्रीलंकेच्या जीवन सिल्वाने सुवर्ण, तर पाकिस्तानच्या निसार अहमदने कांस्यपदक पटकावले. सायकलिंग प्रकारात भारताच्या खात्यात एकूण ६ सुवर्ण, पाच रौप्य आणि दोन कांस्यपदके झाली आहेत.
तिरंदाजांचे निभ्रेळ यश
भारतीय तिरंदाजांनी मंगळवारी खात्यात आणखी पाच सुवर्णपदक आणि दोन रौप्य पदकांची भर घालत निभ्रेळ यश मिळवले. या प्रकारात भारताकडे एकूण दहा सुवर्ण आणि चार रौप्यपदक आहेत. दीपिका कुमारी, लक्ष्मीराणी माझी आणि बोम्बल्या देवी यांनी रिकव्‍‌र्ह सांघिक महिला प्रकारात श्रीलंकेचा ६-० असा धुव्वा उडविला, तर तरुणदीप राय, गुरुचरण बेस्रा आणि जयंत तालुकदार यांनी सांघिक पुरुष प्रकारात श्रीलंकेवर ५-१ अशा फरकाने विजय मिळवला. मिश्र प्रकारात राय आणि दीपिका या जोडीने बांगलादेशवर ६-० असा विजय मिळवून रिकव्‍‌र्ह गटातील दिवसातील तिसरे पदक निश्चित केले. रायने वैयक्तिक गटात बेस्राचा ६-२ असा पराभव करून पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली. दीपिकाने वैयक्तिक गटाच्या अंतिम सामन्यात सुरुवातीच्या निराशाजनक कामगिरीतून दमदार पुनरागमन करताना बोम्बल्या देवीचा ६-४ असा पराभव केला.
१२ सुवर्णपदकांसह वेटलिफ्टिंगपटूंचा निरोप
भारतीय वेटलिफ्टिंगपटूंनी मंगळवारी एक सुवर्ण आणि एक रौप्यपदकाची कमाई केली. वेटलिफ्टिंगच्या १५ गटांपैकी भारतीय खेळाडूंनी १२ गटांमध्ये सुवर्ण व एक रौप्यपदक नावावर केले. यात पुरुषांची सहा सुवर्ण व एक रौप्य, तर महिलांनी सहा सुवर्णपदकांची कमाई केली. मंगळवारी उत्तर प्रदेशच्या सुशिला पवारने ७५ किलोहून अधिक वजनी गटात १९८ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. श्रीलंकेच्या इशानी अनुष्का कालुथनंत्रीला (१७३ किलो) रौप्य, तर नेपाळच्या तारा देवी पूनला (१६५ किलो) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या १०५ किलोहून अधिक गटात गुरदीप सिंगने (३४५ किलो) रौप्यपदक जिंकले. पाकिस्तानच्या मुहम्मद नूह दस्तगीर बटने (३६० किलो) सुवर्ण, तर श्रीलंकेच्या समन गेदाराने (२७५ किलो) कांस्यपदक पटकावले.
टेबल टेनिस मिश्र दुहेरीत सुवर्ण
भारताच्या अँथोनी अमलराज आणि मनिका बात्रा यांनी मिश्र दुहेरीत भारताच्याच जी. साथीयन आणि मौमा दासचे आव्हान ११-५, ४-११, ११-७, ८-११, १२-१० असे परतवून लावत सुवर्णपदक पटकावले.
बास्केटबॉल स्पर्धा गुंडाळली
जागतिक बास्केटबॉल महासंघाने (फिबा) दक्षिण आशियाई स्पध्रेतील बास्केटबॉल प्रकाराला मान्यता नाकारल्यानंतर आयोजकांनी बास्केटबॉल स्पर्धा गुंडाळण्याचा निर्णय घेतला. स्पध्रेचे कार्यकारी अधिकारी आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक इंजेती श्रीनिवास यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकार आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) हस्तक्षेपामुळे फिबाने मान्यता नाकारली होती.

गोळाफेकपटू इंदरजितची माघार

रिओ ऑलिम्पिकची पात्रता मिळवणारा भारताचा गोळाफेकपटू इंदरजित सिंगने पाठीच्या दुखापतीमुळे या स्पध्रेतून माघार घेतली आहे. आशियाई स्पध्रेतील विजेता इंदरजीत ऑलिम्पिक तयारीसाठी अमेरिकेत सराव करत आहे. ‘‘या स्पध्रेत देशाचे प्रतिनिधित्व करता न आल्याचे दु:ख वाटत आहे. मी दुखापतीतून सावरत आहे. पुढील स्पध्रेत सर्वोत्तम कामगिरी करण्याची मी ग्वाही देतो,’’ असे इंदरजितने सांगितले.

खो-खोमध्ये दुहेरी यश : भारताच्या पुरुष व महिला संघांनी खो-खो गटात सुवर्णपदकाची कमाई केली. महिला गटाच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा १६-१४ असा एक डाव व दोन गुणांनी पराभव केला. सारिका काळेने १.४० मिनिटे संरक्षण केले, तर शितल मोरेने ६ बळी टिपले. पुरुष गटातही भारताने ३७-१४ अशा फरकाने बांगलादेशला नमवले. प्रतिक वाईकरने २.३० मिनिटे संरक्षण आणि दोन गडी बाद केले, तर रंजन शेट्टीने १.३० मिनिटे व २ गडी बाद करून त्याला चांगली साथ दिली.

भारतीयांनी मैदानी स्पर्धा गाजवली
’ इंदिरा गांधी स्टेडियमवर रंगलेल्या मैदानी स्पध्रेत पहिल्याच दिवशी भारताने पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि तीन कांस्यपदकांची कमाई केली. मनप्रीत कौरने १७.९४ मीटर गोळाफेक करून भारताला पहिले सुवर्णपदक पटकावून दिले. मनप्रीत (कनिष्ठ)ने १५.९४ मीटर गोळाफेक करून रौप्य, तर डब्लू. फर्नाडोने (१४.८७ मी.) कांस्य जिंकले. पुरुष हातोडा फेक प्रकारात नीरज कुमारने (६६.१४ मी.) सुवर्णपदक पटकावले.
’ महिलांच्या लांब उडीत मयूखा जॉनीने ६.४३ मीटरच्या अंतरासह सुवर्ण निश्चित केले. भारताच्या जी. श्रद्धाने (६.१९ मी.) आणि श्रीलंकेच्या एन.सी.डी. प्रियदर्शिनी (५.८९ मी.) यांनी रौप्य व कांस्यपदक जिंकले.
’ महिला व पुरुष ५००० मीटर शर्यतीत प्रत्येकी सुवर्ण व रौप्यपदक निश्चित केले. पुरुष गटात मन सिंगने १४ मिनिटे २.०४ सेकंदाच्या विक्रमी वेळेसह सुवर्ण, तर सुरेश कुमारने (१४:०२.७०) रौप्य पटकावले. नेपाळचा रिमल हरी कुमार (१४:३२.१८) तिसरा आला.
’ महिला गटात एल. सूर्याने (१५:४५.७५) सुवर्ण, तर स्वाती गाढवेने (१६:१४.५७) रौप्य जिंकले. १०० मीटर शर्यतीत भारताच्या पुरुष व महिलांनी निराश केले. महिला गटात स्राबणी नंदा आणि दुती चंद यांना रौप्य व कांस्यपदकावर, तर महिलांच्या ८०० मीटर शर्यतीत भारताच्या एम. गोमथीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

पदकतालिका
देश     सुवर्ण   रौप्य कांस्य एकूण
भारत       ७८  ३६   १०      १२४
श्रीलंका   १७   ३७   ३३       ८७