यजमान ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज दिल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडवर विजय मिळवत तिरंगी मालिकेतील पहिल्या विजयाची नोंद करेल, अशा आशा पल्लवित झाल्या होत्या, पण भारताच्या पदरी सहज पराभवच पडला. भारतीय फलंदाजांनी स्टिव्हन फिन आणि जेम्स अँडरसनपुढे लोटांगण घातले आणि संघाचा १५३ धावांतच खुर्दा उडाला. इंग्डलने हे आव्हान फक्त एक फलंदाज गमावत पूर्ण करत विजयासह बोनस गुणही पटकावला.
नाणेफेक जिंकत भारताने फलंदाज स्वीकारली आणि तिसऱ्या षटकापासूनच भारताची फलंदाजी ढेपाळायला सुरुवात झाली. अजिंक्य रहाणे (३३) आणि अंबाती रायुडू (२३) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा, पण स्थिरस्थावर झाल्यावर मात्र या दोघांनीही आपल्या विकेट इंग्लंडला आंदण दिल्या. अवघ्या ६७ धावांमध्ये भारताचा अर्धा संघ तंबूत परतलेला होता. ५७ ते ६७ या दहा धावांमध्ये भारताच्या चार फलंदाजांनी आपल्या विकेट्स इंग्लंडला बहाल केल्या. पण त्यानंतर मात्र संघात परतलेला स्टुअर्ट बिन्नी आणि महेंद्रसिंग धोनी (३४) यांनी संघाची गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न करताना सहाव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी रचली. ही जोडी भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देईल असे वाटत असतानाच तिसऱ्या ‘पॉवर प्ले’मध्ये हे दोघेही बाद झाले आणि भारताचा डाव १५३ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून बिन्नीने ३ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर सर्वाधिक ४४ धावांची खेळी साकारली.
फिन आणि अँडरसन या इंग्लंडच्या वेगवान जोडीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. फिनने भारताच्या रहाणे, धोनी, कोहली, रायुडू आणि अक्षर पटेल या पाच जणांना तंबूचा रस्ता दाखवला. अँडरसनने भारताच्या शेपटाला जास्त वळवळायला दिले नाही.
भारताच्या १५४ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला तिसऱ्याच षटकात पहिला धक्का  बसला, पण त्यानंतर इयान बेल आणि जेम्स टेलर यांनी सुंदर फलंदाजीचा नमुना पेश करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बेलने ८ चौकारांच्या जोरावर नाबाद ८८ धावांची खेळी साकारली, तर टेलरने ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ५६ धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १३१ धावांची अभेद्य भागीदारी रचली.

धावफलक
भारत : अजिंक्य रहाणे झे. टेलर गो. फिन ३३, शिखर धवन झे. बटलर गो. अँडरसन १, अंबाती रायुडू झे. बटलर गो. फिन २३, विराट कोहली झे. बटलर गो. फिन ४, सुरेश रैना यष्टिचीत बटलर गो. अली १, महेंद्रसिंग धोनी झे. बटलर गो. फिन ३४, स्टुअर्ट बिन्नी झे. मॉर्गन गो. अँडरसन ४४, अक्षर पटेल त्रि. गो फिन ०, भुवनेश्वर कुमार त्रि. गो. अँडरसन ५, मोहम्मद शमी झे. अली गो. अँडरसन १, उमेश यादव नाबाद ०, अवांतर (लेग बाइज ३, वाइड ३, नो बॉल १) ७, एकूण ३९.३ षटकांत सर्व बाद १५३.
बाद क्रम : १-१, २-५७, ३-६४, ४-६५, ५-६७, ६-१३७, ७-१३७, ८-१४३, ९-१५३, १०-१५३.
गोलंदाजी : जेम्स अँडरसन ८.३-२-१८-४, ख्रिस वोक्स ७-०-३५-०, स्टुअर्ट ब्रॉड ७-०-३३-०, स्टिव्हन फिन ८-०-३३-५, मोइन अली ९-०-३१-१.
इंग्लंड : इयान बेल नाबाद ८८, मोइन अली झे. कोहली गो. बिन्नी ८, जेम्स टेलर नाबाद ५६, अवांतर (वाइड ३, नो बॉल १), एकूण २७.३ षटकांत १ बाद १५६.
बाद क्रम : १-२५.
गोलंदाजी : स्टुअर्ट बिन्नी ७-०-३४-१, भुवनेश्वर कुमार २-०-१८-०, उमेश यादव ६-०-४२-०, मोहम्मद शमी ४-०-२३-०, अक्षर पटेल ७.३-०-३२-०, सुरेश रैना १-०-७-०.
गुण – इंग्लंड : ५, भारत : ०.

ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना चांगली सुरुवात होणे महत्त्वाचे असते, पण याचा अर्थ दमदार सलामी मिळायला हवी, असा होत नाही. तुम्ही लवकर फलंदाज गमावल्यावर फलंदाजांनी खेळपट्टीवर उभे राहून चांगली भागीदारी रचायला हवी. कारण अखेरच्या षटकांमध्ये विकेट्स हातामध्ये असतील तर मोठी धावसंख्या उभारता येते. पण ठरावीक फरकाने आम्ही फलंदाज गमावले आणि त्यामुळेच पराभव पदरी पडला.
महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार

चांगली कामगिरी करून संघाला विजय मिळवून देणे, हेच नेहमी माझे ध्येय असते. आजच्या सामन्यात पाच फलंदाजांना बाद करत इंग्लंडच्या विजयात हातभार लावता आल्यामुळे मी आनंदी आहे. गेल्या वर्षभरात मला बरेच अनुभव आले, त्या अनुभवांमधून शिकत आणि अथक मेहनत घेतल्यामुळे आजचा दिवस मला पाहायला मिळाला आहे. या सामन्यात चेंडूची दिशा आणि टप्पा योग्य ठेवल्यामुळे मला यश मिळाले आहे. त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये सातत्य राखण्यातही मला यश आले. यापुढेही अशीच दमदार कामगिरी करून इंग्लंडच्या विजयाला हातभार लावणे, हेच माझे ध्येय असेल.
– स्टिव्हन फिन, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज