भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून वामन कुमार आणि रमाकांत देसाई यांना विशेष पुरस्कार

स्थानिक क्रिकेटमध्ये दिमाखदार कारकीर्द घडवणाऱ्या मात्र भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू न शकलेल्या राजिंदर गोयल आणि पद्माकर शिवलकर या दिग्गजांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या दोघांच्या बरोबरीने माजी महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी यांनाही याच पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी निवड होणाऱ्या रंगास्वामी पहिल्या महिला खेळाडू आहेत. ८ मार्चला बंगळुरू येथे होणाऱ्या सोहळ्यात त्यांना गौरवण्यात येणार आहे.

भारतीय क्रिकेटला अमूल्य योगदानासाठी वामन विश्वनाथ कुमार आणि दिवंगत रमाकांत देसाई यांना बीसीसीआयतर्फे विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मन्सूर अली खान पतौडी स्मृतिप्रीत्यर्थ पाचवे व्याख्यान झाल्यानंतर पुरस्कार्थीचा गौरव करण्यात येणार आहे. माजी कसोटीपटू फारुख इंजिनीयर यंदा वक्ते असणार आहेत. यष्टींपाठी घोटीव चपळता आणि आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध फारुख यांनी ४६ कसोटी आणि पाच एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले.

एन. राम, रामचंद्र गुहा आणि डायना एडल्जी यांचा समावेश असलेल्या समितीने पुरस्कार्थीची निवड केली. गोयल आणि शिवलकर यांना भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. मात्र स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांनी अनेक वर्ष दबदबा राखला. मुंबईसाठी खेळताना शिवलकर यांनी १२४ सामन्यांमध्ये ५८९ बळी मिळवले. प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी ४२ वेळा डावात पाच बळी घेण्याची तर १३ वेळा सामन्यात १० बळी घेण्याची किमया साधली. हरयाणाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोयल यांच्या नावावर ७५० बळी आहेत. यापैकी ६३७ रणजी क्रिकेट स्पर्धेत आहेत. रणजी स्पर्धेत सर्वाधिक बळींचा विक्रम आजही गोएल यांच्याच नावावर आहे.

आपल्या डावखुऱ्या फिरकीने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना भंबेरी उडवणाऱ्या बिशनसिंग बेदी यांच्या काळात शिवलकर आणि गोएल खेळत असल्याने त्यांना राष्ट्रीय संघात स्थान मिळू शकले नाही. १९७५-७६ हंगामात बीसीसीआयने बेदी यांच्यावर बंदीची कारवाई केली होती. मंडळावर टीका केल्याप्रकरणी बेदी यांना बंदीला सामोरे जावे लागले होते. त्या वेळी बेदी यांच्याऐवजी शिवलकर यांची निवड करण्यात आली होती, मात्र १२वा खेळाडू म्हणूनच त्यांना समाधान मानावे लागले. महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी यांनी १२ कसोटी आणि १६ एकदिवसीय सामन्यांत भारताचे नेतृत्व केले.

महिला क्रिकेटपटूंचाही गौरव होतो आहे, ही समाधानकारक गोष्ट आहे. उशिरा का होईना त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. त्याकाळी खेळणे अत्यंत कठीण गोष्ट होती. मात्र शांता रंगास्वामींसारख्या खेळाडूंनी युवा खेळाडूंसाठी पाया रचला. बीसीसीआयने महिला क्रिकेट प्रशासनाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर चित्र हळूहळू बदलते आहे. मात्र तरीही सुधारणेला प्रचंड वाव आहे.

डायना एडल्जी