दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ८ विकेट्स राखून विजय; मालिकेत २-० अशी विजयी आघाडी; युजवेंद्र चहलचे ३ बळी

हरारेत सोमवारी भारताने ‘जिंका रे’चा बुलंद नारा दिला. अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन करीत दुसरा एकदिवसीय सामना आठ विकेट्स राखून जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी प्राप्त केली.

नवख्या भारतीय संघाने पुन्हा एकदा वर्चस्वपूर्ण कामगिरी बजावली. आधी यजमानांचा डाव फक्त ३४.३ षटकांत १२६ धावांत गुंडाळला आणि मग ते अंतर २६.५ षटकांत पार केले. आता बुधवारी होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून भारताने निभ्रेळ  यश मिळवले, तर २०१३ आणि २०१५नंतर अशा वर्चस्वपूर्ण कामगिरीची हॅट्ट्रिक साजरी होईल.

लेग-स्पिनर युजवेंद्र चहलने २५ धावांत ३ बळी घेत झिम्बाब्वेच्या मधल्या फळीला हादरे दिले. मग अंबाती रायुडूने ४४ चेंडूंत ४१ धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. मागील सामन्यातील शतकवीर लोकेश राहुलने (३३) करुण नायर (३९) सोबत ५८ धावांची सलामी नोंदवली. मग रायुडू आणि नायर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी रचली.

त्याआधी, चहलच्या नेत्रदीपक फिरकी गोलंदाजीच्या बळावर झिम्बाब्वेचा डाव १२६ धावांत आटोपला. झिम्बाब्वेने ३ बाद १०६ अशी चांगली सुरुवात केली होती, पण त्यांचे अखेरचे सात फलंदाज फक्त २० धावांत गारद झाले. भारताकडून वेगवान गोलंदाज बरिंदर शरणने १७ धावांत २  आणि धवल कुलकर्णीने ३१ धावांत २ बळी घेतले. ३ बळी घेणाऱ्या युजवेंद्रला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

झिम्बाब्वे : ३४.३ षटकांत सर्व बाद १२६ (वुसी सिबांडा ५३, चामू चिभाभा २१, सिकंदर रझा १६; युजवेंद्र चहल ३/२५, बरिंदर शरण २/१७, धवल कुलकर्णी २/३१) पराभूत वि. भारत : २६.५ षटकांत २ बाद १२९ (अंबाती रायुडू नाबाद ४१, करुण नायर ३९, लोकेश राहुल ३३; सिकंदर रझा १/७, चामू चिभाभा १/३१)

सामनावीर : युजवेंद्र चहल.