तळाच्या फलंदाजांनी गोलंदाजांना झुंजवल्याचे चित्र भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात पाहायला मिळाले. भारताच्या दुसऱ्या डावातही त्याचा प्रत्यय आला. दिवसाच्या सुरुवातीलाच भारताची पडझड झाल्यानंतर स्टुअर्ट बिन्नीने रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार यांच्या साथीने भारताचा दुसरा डाव सावरला. भारताच्या फलंदाजांनी पाचवा दिवस खेळून काढत ९ बाद ३९१ धावा केल्या. अखेर तिसऱ्या सत्रात सामना अनिर्णीतावस्थेत ठेवण्याचा निर्णय दोन्ही संघांनी घेतला.
कालच्या ३ बाद १६७ वरून सुरुवात करताना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने लागोपाठच्या दोन षटकांत भारताला दोन हादरे दिले. पाठोपाठ कर्णधार महेंद्रसिंग धोनीही माघारी परतला. त्यामुळे भारताची ६ बाद १८४ अशी बिकट अवस्था झाली होती. पण या सामन्यात कसोटी पदार्पण करणाऱ्या बिन्नीने भारताला संकटातून बाहेर काढले. त्याने जडेजासह सातव्या विकेटसाठी ६५ धावांची तर भुवनेश्वरसह आठव्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी रचली. भुवनेश्वरने सलग दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावले. त्याने १० चौकारांसह नाबाद ६३ धावांची खेळी केली. बिन्नीने ११४ चेंडूत आठ चौकार आणि एक षटकारासह ७८ धावांची खेळी केली. जडेजाने ३१ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
भारत : पहिला डाव- सर्व बाद ४५७, इंग्लंड : पहिला डाव- सर्व बाद ४९६, भारत : दुसरा डाव- १२३ षटकांत ९ बाद ३९१ (स्टुअर्ट बिन्नी ७८, भुवनेश्वर कुमार नाबाद ६३; मोईन अली ३/१०५, स्टुअर्ट ब्रॉड २/५०).